शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही
By Admin | Published: April 25, 2016 11:14 PM2016-04-25T23:14:08+5:302016-04-25T23:23:20+5:30
अहमदनगर : सततच्या दुष्काळाने शेतकरी खचला आहे़ त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे आणि खते उपलब्ध होतील, याची काळजी प्रशासनाने घ्यावी़
अहमदनगर : सततच्या दुष्काळाने शेतकरी खचला आहे़ त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे आणि खते उपलब्ध होतील, याची काळजी प्रशासनाने घ्यावी़ कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तशा तक्रारी प्राप्त झाल्यास खपवून घेणार नाही, असा इशाराच पालकमंत्री राम शिंदे यांनी सोमवारी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिला आहे़
पालकमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पाडली़ जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, आ़ शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे आदी यावेळी उपस्थित होते़ सुलभ पीक कर्ज योजनेसाठी जिल्ह्यातील ८ लाख शेतकरी पात्र ठरले आहेत़ खरिपाचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, यंदा चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे़ त्यादृष्टीने खरीप हंगामात बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे़ जिल्ह्यात खरीप हंगामातील ५ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असून, त्यासाठी लागणारे खत शेतकऱ्यांना बांधावर उपलब्ध करून देण्यावर भर आहे़ शेतकऱ्यांच्या कंपन्या आणि गटांमार्फत ते पुरविले जाणार आहे़ यंदा प्रथम निमकोटेड युरिया उपलब्ध होत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी १० टक्के युरियाचा कमी वापर करावा़ जिल्ह्यातील युरियाची मागणी मोठी आहे़ मागणीप्रमाणे युरियाचा पुरवठा करण्यात येईल़ वेळप्रसंगी सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले़ खरीप हंगामात बाजारात येणाऱ्या खते व बियाणांवर गुण नियंत्रक विभागाचे नियंत्रण असणार आहे़ त्याचबरोबर कृषी, महसूल आणि जिल्हा परिषद यांनी एकत्र नियोजन करून त्यानुसार शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावेत़ शेतकरी आधीच दुष्काळाने खचला आहे़ यंदाच्या हंगामात उत्पन्नाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे़ शेतकरी आशावादी असून, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची गरज आहे, त्यात कसूर होणार नाही़ चुकीचे काम करणाऱ्याविरोधात थेट गुन्हे दाखल करा, शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार खपवून घेणार नाही, अशी तंबी शिंदे यावेळी अधिकाऱ्यांना दिली़ (प्रतिनिधी)
आंदोलनकर्त्या सेनेला केले लक्ष्य
छावण्या सुरू करण्यासाठी आंदोलने केली़ मात्र परिपूर्ण प्रस्ताव देण्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही़ त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी प्रस्ताव दाखल करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी टीका शिंदे यांनी सेनेने केलेल्या आंदोलनाचा थेट उल्लेख न करता केली़
७३ हजार ५१७ क्विंटल बियाणे
भात- २ हजार ८५१, ज्वारी-३०, बाजरी-५ हजार ५४९, मका- १३ हजार ७६७, तूर- १ हजार २४, मूग-१ हजार ६९०, उडीद-२ हजार ६१८, भुईमूग-१ हजार ५००, सोयाबीन- ४२ हजार ११, कापूस- २ हजार १६०
खरीप पिकासाठी जिल्ह्यात एकूण १ लाख ३२ हजार मेट्रीक टना खताची आवश्यकता भासणार आहे़ त्यानुसार मागणी करण्यात आली आहे़ युरिया ६० हजार ८५६ मेट्रीक टन लागेल़ त्यापैकी केंद्रातर्फे ५० हजार मेट्रीक टन उपलब्ध होणार आहे़ त्यामुळे युरियाची अडचणी येऊ शकते, असाही अंदाज आहे़ याशिवाय डीएपी-४ हजार ५७२, एमओपी-६ हजार ३३६, एसएसपी-९ हजार ५९ मेट्रीक टन खतांची गरज भासणार आहे़