...म्हणे साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षात कुरडया नकोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 09:45 PM2018-04-06T21:45:06+5:302018-04-06T21:46:18+5:30
साईनगरीतील महिलांनी यंदा कुरडया तयार करण्याकडे पाठ फिरवली आहे. यंदा साई शताब्दी वर्षात विकास कामे झाली नसल्यामुळे हा बहिष्कार नव्हे तर केवळ बिनबुडाच्या अफवांमुळे शिर्डीत यंदा कुरडया करण्यात येत नाहीत.
शिर्डी : साईनगरीतील महिलांनी यंदा कुरडया तयार करण्याकडे पाठ फिरवली आहे. यंदा साई शताब्दी वर्षात विकास कामे झाली नसल्यामुळे हा बहिष्कार नव्हे तर केवळ बिनबुडाच्या अफवांमुळे शिर्डीत यंदा कुरडया करण्यात येत नाहीत.
महाराष्ट्रात सणासुदीला किंवा आंनदाच्या क्षणी जेवणात कुरडई नाही असे क्वचीतच होते. उन्हाळ्यात भल्या पहाटे प्रत्येक गल्लीत एकमेकींच्या मदतीने कुरडया तयार करण्याची लगबग बघायला मिळते. शिर्डीत मात्र यंदा अक्षरश: सामसुम आहे. साईबाबांचे समाधी शताब्दी वर्ष असल्याने कुरडया करणे अशुभ असल्याची अफवा पसरल्याने हा चमत्कार घडला आहे. काहीजण विकत घेतील किंवा काहीजण नातलगांकडुन आणतील पण या अंधश्रद्धेतुन बाहेर पडले नाही तर अनेक गोरगरीबांना यंदा कुरडई शिवाय सण साजरे करावे लागणार आहेत.एखाद्या घरात दुख:द घटना घडली तर त्या वर्षी कुरडया तयार करत नाहीत. सामान्य व्यक्तीच्या बाबतीत पुण्यस्मरण म्हटले जाते तर संताच्या निर्वाण दिनाला पुण्यतिथी म्हटले जाते, त्यांच्या निर्वाणाने तो दिवस सुद्धा पावन होतो. सार्इंच्या समाधीला यंदा शंभर वर्षे होत आहेत. साई समाधी शताब्दीच्या रूपाने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी व एकदाच येणारी दिवाळी आपण साजरी करत आहोत.
पुरोहित बाळासाहेब जोशी याबाबत म्हणाले, कुरडया वेटोळ्याच्या असतात म्हणुन चालत नाही असे म्हणणारांना जिलेबी, शेव चालते. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत त्याचा व शताब्दीचा काहीही संबध नाही. या अफवांवर कोणीही विश्वास ठेवु नये व बिनधास्त कुरडया बनवाव्यात. पुरोहित अनंतशास्त्री लावर म्हणाले, समाधी शताब्दी वर्षात कुरडया करायच्या नाही याला कोणताही शास्त्राधार नाही, ही निव्वळ कुणीतरी खोडसाळपणे पसरवलेली अफवा आहे, गजानन महाराजांच्या समाधी शताब्दीतही शेगावला अस काही झाले नाही, घरात दुख:द घटना घडली तरच कुरडया करत नाहीत़ यंदा समाधी शताब्दीचे पावन वर्ष आहे, तेव्हा कुरडया करायला काहीच हरकत नाही.
वैभवशास्त्री म्हणाले, या वर्षी कुरडया करू नये अशी अफवा पसरली आहे पण तीला कोणताही शास्त्राधार नाही आणि व्यवहारीकदृष्ट्या ही गोष्ट संयुक्तीक नाही. या उलट बाबांसाठी या वर्षी जास्त कुरडया बनवुन भक्तांमध्ये वितरीत कराव्या असे मला वाटते.