आमच्या मुलाचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका : काकासाहेब शिंदे कुटुंबीयांचा टाहो

By सुधीर लंके | Published: July 26, 2018 11:34 AM2018-07-26T11:34:42+5:302018-07-26T11:35:24+5:30

काकासाहेब याने समाजासाठी बलिदान दिले आहे. सरकारने व समाजानेही त्याचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नये. काकासाहेब याचे आरक्षणाच्या रुपाने स्मारक व्हावे, असा टाहो फोडत मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या दिवंगत काकासाहेब शिंदे यांच्या आई, वडिलांनी व भावाने आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.

Do not waste our son's sacrifice: Tao of Kakasaheb Shinde family | आमच्या मुलाचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका : काकासाहेब शिंदे कुटुंबीयांचा टाहो

आमच्या मुलाचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका : काकासाहेब शिंदे कुटुंबीयांचा टाहो

सुधीर लंके
अहमदनगर : काकासाहेब याने समाजासाठी बलिदान दिले आहे. सरकारने व समाजानेही त्याचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नये. काकासाहेब याचे आरक्षणाच्या रुपाने स्मारक व्हावे, असा टाहो फोडत मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या दिवंगत काकासाहेब शिंदे यांच्या आई, वडिलांनी व भावाने आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.
गंगापूर (जि. औरंगाबाद) तालुक्यात कानडगाव येथे शिंदे कुटुंबीय राहते. काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूमुळे हे गावच सैरभैर झालेले दिसले. गावात शिंदे यांच्या घराकडे जाणाऱ्या चौकात ‘मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारा शिवाजी महाराजांचा मावळा’ असा काकासाहेब यांच्या स्मृती जागविणारा फलक लावण्यात आला आहे. शिंदे कुटुंब साध्या पत्र्याच्या घरात राहते.
या कुटुंबाला केवळ एक एकर शेती आहे. काकासाहेब याच्या वडिलांनी गवंडी काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. काकासाहेब हा घरात सर्वात थोरला होता. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो वाहनचालक म्हणून काम करत कुटुंबाच्या उपजीविकेसाठी हातभार लावत होता. त्याच्यापेक्षा लहान बहीण सविता ही विवाहित आहे. त्याचा लहान भाऊ अविनाश हा २०१० पासून संभाजी ब्रिगेडमध्ये कार्यरत आहे. सध्या तो गंगापूरचा तालुकाध्यक्ष आहे. भावासोबत काकासाहेबही ब्रिगेडच्या विचाराचा समर्थक होता. हे दोघेही अविवाहित आहेत.
शिंदे कुटुंबीयांच्या घराची पहिली खोली ही जिजामाता आणि शिवराय यांच्या प्रतिमांनी भरलेली आहे. जिजामातेची मोठी प्रतिमा भिंतीवर लावलेली आहे. एका कोपºयात फेटा परिधान केलेला शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा ठेवलेला आहे. सोबत शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा. ‘आरक्षण हे माझे आता एकमेव ध्येय आहे’ असे काकासाहेब हा नेहमी घरात म्हणत होता. पण तो असे काही करेल याची कल्पनाही करवत नाही’, अशी भावना आई मीराबाई यांनी व्यक्त केल्या. मराठा समाजाला आरक्षण देणे हीच त्याला श्रद्धांजली ठरेल. समाजाने त्याचे स्मारक निर्माण करावे, अशा भावना इतर नातेवाईक महिलांनी बोलून दाखविल्या.
काकासाहेब हा संघटनेत आक्रमक होता. मराठा आंदोलनातही तो सतत अग्रभागी असे. त्याला पोहता येत नव्हते. मात्र, आरक्षणाच्या प्रश्नासाठी त्याने स्वत:च्या जीवाचा विचार न करता शंभर फुटावरुन पाण्यात उडी घेतली, असे त्याचा भाऊ अविनाश याने सांगितले. अविनाश हा संघटनेत शांत व संयमी कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो.

मृत्यूला पोलीस प्रशासन जबाबदार
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा हा अगोदरच दिलेला होता. याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, तरीही प्रशासनाने काहीच दखल घेतली नाही. सोमवारी कायगाव टोका फाट्यावर सुरुवातीला आम्ही ठिय्या आंदोलन केले. तेव्हा तीस-चाळीस पोलीस उपस्थित होते. मात्र, पोेलीस निरीक्षकापेक्षा एकही वरिष्ठ अधिकारी फिरकला नाही. महसूल प्रशासनाच्या वतीने तर केवळ तलाठी निवेदन स्वीकारण्यासाठी आले. त्यामुळे तरुण संतापले. काही तरुण पुलाच्या दिशेने जलसमाधी घेण्यासाठी पळू लागले तेव्हाही केवळ चार-पाच पोलीस पुलाकडे आले. आपल्या भावाने नदीत उडी मारली आहे याची अगोदर आपणालाही कल्पना नव्हती. मात्र, त्याला वाचविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला नाही. इतर लोक त्याला वाचवू पाहत होते. मात्र, पोलिसांनी त्यांनाही रोखले. जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही प्रशासनाने ना मागणीची दखल घेतली, ना आंदोलकांना अडविले. काही अनुचित प्रकार घडलाच तर प्रशासनाने पाणबुडी व इतर उपाययोजना करुन ठेवायला हवी होती. मात्र, प्रशासनाने तशीही खबरदारी घेतली नाही. काकासाहेब हा शासकीय अनास्थेचा बळी आहे, अशी प्रतिक्रिया दिवंगत काकासाहेब याचा लहान बंधू अविनाश शिंदे याने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

सरकारकडून काहीच दखल नाही
च्काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर अनेक संघटना या परिवाराची भेट घेऊन सांत्वन करत आहेत. मात्र, सरकारपैकी कुणीही अद्याप या परिवाराला भेट दिलेली नाही. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी परिवाराला भेट देऊन सांत्वन केले. नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप व पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी भेट देऊन प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत दिली आहे.

Web Title: Do not waste our son's sacrifice: Tao of Kakasaheb Shinde family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.