सावेडीत हवेची वारीत धमाल करू... मस्ती करू! - भाऊ कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 01:28 PM2017-12-10T13:28:47+5:302017-12-10T13:29:36+5:30
हवेच्या वारीत हास्याचे कारंजे उसळणार आहेत. यात न्हाऊन घेण्यासाठी नगरकरांनी सज्ज व्हावे. हवेच्या वारीत नेहमीच मार्मिक आणिमनोरंजनात्मक अभिनयातून हास्याची पुरेवाट लागते. नगरला होणा-या कार्यक्रमातही जे तुम्ही पाहिलेले नाही, असे काही नावीन्यपूर्ण प्रयोग सादर होणार आहेत. त्यासाठी तुम्ही हवेच्या वारीत पोट धरून हसण्यासाठी नक्की या आणि भरपूर धमाल, मस्ती करा, असे आवाहन अभिनेते, विनोदवीर भाऊ कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
अहमदनगर : हवेच्या वारीत हास्याचे कारंजे उसळणार आहेत. यात न्हाऊन घेण्यासाठी नगरकरांनी सज्ज व्हावे. हवेच्या वारीत नेहमीच मार्मिक आणि मनोरंजनात्मक अभिनयातून हास्याची पुरेवाट लागते. नगरला होणा-या कार्यक्रमातही जे तुम्ही पाहिलेले नाही, असे काही नावीन्यपूर्ण प्रयोग सादर होणार आहेत. त्यासाठी तुम्ही हवेच्या वारीत पोट धरून हसण्यासाठी नक्की या आणि भरपूर धमाल, मस्ती करा, असे आवाहन अभिनेते, विनोदवीर भाऊ कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
राज्यभर प्रसिद्ध असलेली ‘हवेची वारी’ सोमवारी (दि. ११) नगरमध्ये दाखल होत आहे. ‘चला हवा येऊ द्या’ चे नामवंत हास्य कलाकारांच्या माध्यमातून नगरकरांना खास मनोरंजनाची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारे तसेच सातासमुद्रापार मराठी बाणा गाजविणारे प्रसिद्ध मराठी कलाकार आणि त्यांची खास खुमासदार शैली नगरकरांना अनुभवता येणार आहे. गायत्री एंटरटेनमेंटच्या वतीने सोमवारी (दि. ११ डिसेंबर) सायंकाळी सात वाजता ‘हवेची वारी - नगरच्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची टीम एकत्र येऊन नगरकरांना पोट धरून हसायला लावणार आहे. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे. हा कार्यक्रम सावेडीतील प्रोफेसर चौकातील जॉगिंग ट्रॅकवर होणार आहे. प्रसिद्ध कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, हेमांगी कवी, प्रिया मराठे आणि संकर्षण कराडे ही टीम त्यांच्या खास शैलीत ‘हवेची वारी’ नगरच्या दारी घेवून येत आहे. विनोदी अभियनाने एका पेक्षा एक सरस प्रयोग या कार्यक्रमात सादर होणार आहेत.
टाईमिंग साधणारे हास्य बॉम्ब
या कार्यक्रमाबाबत भाऊ कदम म्हणाले, ‘चला हवा येवू द्या’ कार्यक्रमात प्रत्येक प्रयोग वेगळा असतो. प्रयोगात नावीन्य असते. आतापर्यंत जे पाहिले, त्यापेक्षाही वेगळे व अधिक दर्जेदार सादर करण्यासाठी टीम मेहनत घेते. जोड्या-जोड्यांनी आणि एकत्रित असे सादरीकरण होणार आहे. त्यामुळे हास्याची धम्माल उडणार आहे. विनोदामध्ये टाईमिंग महत्त्वाचा असतो. ते प्रत्यक्ष कार्यक्रमात दिसेल. असे विनोदाचे अनेक टाईमिंग साधणारे हास्याचे बॉम्ब फुटणार आहेत. म्हणूनच नगरकरांनी हसण्यासाठी सज्ज व्हावे.