जवळा येथे सोन्याच्या आमिषाने डॉक्टरचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 08:42 PM2018-03-27T20:42:00+5:302018-03-27T20:48:28+5:30
स्वस्तातील सोने घेण्यासाठी तालुक्यातील जवळा येथे आलेल्या दोन डॉक्टरांना तीन अज्ञात चोरट्यांनी बनावट सोने दिले. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. चोरटे पळून जाताना दोन डॉक्टरांंनी त्यांचा पाठलाग केला.
जामखेड : स्वस्तातील सोने घेण्यासाठी तालुक्यातील जवळा येथे आलेल्या दोन डॉक्टरांना तीन अज्ञात चोरट्यांनी बनावट सोने दिले. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. चोरटे पळून जाताना दोन डॉक्टरांंनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी चोरट्यांनी केलेल्या चाकू हल्ल्यात एका डॉक्टराचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा डॉक्टर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी जामखेड तालुक्यातील जवळा शिवारात घडली.
या हल्ल्यातून वाचलेले डॉ. मनोरंजन जोगेश हालदार यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यांचे भाऊ डॉ. श्रीकृष्ण जोगेश हालदार (रा.भंडारवाडी ता. जि. उस्मानाबाद) हे मूळव्याधीचा उपचार करणारे डॉक्टर आहेत. भाऊ व्यवसायानिमित्त वर्धा व अमरावती येथे जातात. तेथे जवळा (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथील दोघा जणांशी त्यांची भेट झाली. जुने सापडलेले सोने तीन लाख रुपयांत ३०० ग्रॅम देण्याचे दोघांनी सांगितले. त्यामुळे श्रीकृष्ण हालदार हे त्यांच्या गावी (भंडारवाडी, ता. जि. उस्मानाबाद) असलेल्या डॉ. मनोरंजन यांनाही माहिती दिली. डॉक्टर असलेल्या दोघा भावंडांनी तीन लाख रुपये घेवून मंगळवारी सकाळी उस्मानाबाद बसस्थानकातून तुळजापूर-नाशिक बसने जामखेड येथे पोहोचले. तेथून ते सांगितल्याप्रमाणे जवळा शिवारातील इंग्लिश मीडियम स्कूलजवळ गेले. त्यांच्याकडील फडक्यात गुंडाळून ठेवलेले सोने घेवून त्यांना तीन लाख रुपये दिले. सोने घेतल्यानंतर ते बनावट असल्याचे लक्षात आल्यावर त्या दोघांना विचारणा केली. मात्र त्यांनी लगेच धूम ठोकली. त्यांचा पाठलाग केला, परंतु चोरट्यांनी डॉ. श्रीकृष्ण यांच्या छातीत, पोटात चाकूने वार केले. डॉ. मनोरंजन यांनाही जखमी केले. त्यानंतर दोघेही बेशुद्ध पडले.
जखमीवर उपचार सुरू
मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास जखमी अवस्थेत पडलेल्या दोघांना पाहून एकाने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन केला. तेथे रूग्णवाहिका गेल्यानंतर डॉक्टरांनी श्रीकृष्ण मयत झाल्याचे पोलिसांना फोन करून सांगितले. दुसरे डॉ. मनोरंजन हालदार हे गंभीर जखमी आहेत. पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे यांनी घटनास्थळी जाऊन जखमीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.