देशी दारूचा काढा कोरोनावर उपयुक्त असल्याचा दावा डॉक्टरला भोवला; तहसीलदार यांनी नोटीस बजावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 09:17 PM2021-05-11T21:17:30+5:302021-05-11T21:18:42+5:30
देशी दारूची (३० एमएल) मात्रा देऊन ५० पेक्षा अधिक रुग्ण बरे केल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या बोधेगाव येथील डॉक्टरला शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी नोटीस बजावली आहे. काटे यांनी २४ तासांत खुलासा सादर करण्याचे, तर तहसीलदार अर्चना पागिरे यांनी समक्ष येऊन खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत.
शेवगाव : देशी दारूचा काढा कोरोना आजारावर उपयुक्त असल्याचा दावा करीत देशी दारूची (३० एमएल) मात्रा देऊन ५० पेक्षा अधिक रुग्ण बरे केल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या बोधेगाव येथील डॉक्टरला शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी नोटीस बजावली आहे. काटे यांनी २४ तासांत खुलासा सादर करण्याचे, तर तहसीलदार अर्चना पागिरे यांनी समक्ष येऊन खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना रुग्णांना ३० एमएल देशी दारू व त्याच प्रमाणात पाणी एकत्र करून दिल्यास कोरोना आजार बरा होतो, असा दावा करणारा संदेश बोधेगाव येथील डॉ. अरुण भिसे यांनी सोशल मीडियावर टाकला होता. त्यांचा हा दावा राज्यभर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्या संदेशात रुग्णांना देशी दारू कोणत्या प्रमाणात द्यायला हवी, तसेच बरे झालेल्या रुग्णांचा अभिप्राय, सोबत काही संशोधनाचे मुद्दे घालण्यात आले होते. तो संदेश दिवसभरात प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर फिरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, दारू पिणाऱ्यांना हा आयताच बहाणा मिळाला आहे. या संदेशामुळे वैद्यकीय क्षेत्रातही या चर्चेला मोठे उधाण आले आहे, तर नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळाले.
मंगळवारी शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी डॉ. भिसे यांना नोटीस काढून २४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच तहसीलदार अर्चना पागिरे यांनी त्यांना संपर्क साधून बुधवारी (दि.१२) तहसील कार्यालयात समक्ष हजर राहून खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत.
भिसे तपासणी पथकात
कोरोना आजारावर दारूचा सल्ला देणारे डॉ. भिसे हे शालेय आरोग्य तपासणी पथकात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत आहेत. सध्या अपुऱ्या मनुष्यबळाअभावी त्यांना बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात थांबण्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तो संदेश मी वाचला नाही. आपणाकडे असेल तर मला पाठवा. त्यानंतर कळवतो, असे सांगितले. त्यांना ‘लोकमत’ प्रतिनिधीने संदेश पाठवून पुन्हा त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे ‘त्या’ डॉक्टरला पाठीशी घालण्याचा प्रकार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.