कोरोना काळात डॉक्टरांचे वजन घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:21 AM2021-05-26T04:21:12+5:302021-05-26T04:21:12+5:30
जिल्ह्यात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाने शिरकाव केला. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. ...
जिल्ह्यात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाने शिरकाव केला. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. उपलब्ध डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हा आजार नवाच होता. आजारावर औषध तसेच प्रारंभी लसही नव्हती. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने लागणारी साधन सामग्रीही अपुरीच होती. शिवाय, आरोग्य विभागात डॉक्टरांची रिक्त पदेही होती. अशा स्थितीतही डॉक्टर व आरोग्य कर्मचारी रुग्णसेवेला प्राधान्य देत कोरोनाशी लढा देत आहेत. वेळप्रसंगी डॉक्टरांना २४ तास ड्युटी करावी लागत आहे. या काळात कामाचा वाढलेला व्याप, त्यामुळे होणारी धावपळ, यामुळे डॉक्टरांचे आरोग्याकडेही दुर्लक्ष होऊ लागले. परिणामी, अनेक डॉक्टरांचे ५ ते १० किलो वजन घटले आहे.
‐-----
काय करीत आहेत डॉक्टर?
धावपळ सुरू असली तरी सध्या डॉक्टर आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी सकस आहार, योगासने, नियमित व्यायाम करण्यावर भर देत आहेत. वेळेचे कोणतेच गणित सध्या नाही. डबा ऑफिसमध्येच, रुग्णालयात खाण्यामुळे धावपळ कमी होत आहे.
-----
रुग्णालय संख्या - २३०
डॉक्टर्सची संख्या - १०२०
आरोग्य कर्मचारी - ७०००
-----
कोरोना काळात कामाचा अधिक ताण वाढला. कोविड कक्षात काम करीत असताना दोन वेळेस राऊंड घेणे, मॉनिटर करणे, ऑक्सिजनचा पुरवठा होतो का नाही, याची पहाणी करणे, तसेच क्रिटिकल रुग्ण रेफर करणे अशी नियमित ड्युटी आहे. त्याचबरोबर विविध बैठकांना उपस्थित राहणे. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्षही झाले होते. त्यामुळे काही प्रमाणात वजन घटले आहे. आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी व्यायाम व प्राणायाम करीत आहे.
- डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्य चिकित्सक
-----
माझे वजन खूप होते. कामामध्ये जेवणाकडेही दुर्लक्ष व्हायचे. त्यामुळे आता वजन पाच ते दहा किलोने घटले आहे. नियमित व्यायाम करूनही वजन कमी होत नव्हते. मात्र, कोविडच्या कामामुळे वजन कमी झाले आहे. वजन कमी होणे माझ्यासाठी सकारात्मक बाब आहे. सध्या निरोगी आरोग्यासाठी व्यायाम नियमित करीत आहे. आहारावर नियंत्रण आहे.
- डॉ. अनिल बोरगे, वैद्यकीय अधिकारी
------
नियमित रुग्ण कमी झालेले असले तरी कोरोना रुग्ण वाढत आहेत. गत महिन्यात खूप धावपळ झाली. ऑक्सिजन तुटवडा होता त्यावेळी जास्त धावपळ झाली. यातही नियमित व्यायाम व संतुलित आहार हा नियम कायम ठेवला. धावपळीमुळे थोडे फार वजन कमी होतेच.
डॉ. सतीश सोनवणे, कॅन्सर तज्ज्ञ
------
सकस व पौष्टिक आहार
कामाच्या व्यापामुळे ताणतणाव वाढतो. या काळात शारीरिक व मानसिक आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी डॉक्टर सकाळी धावणे, योगा करून ताण घालवत आहेत. त्याचबरोबर आहाराकडेही विशेष लक्ष देत आहेत. सकाळी नाष्टा, दुपारी व रात्री जेवण करीत आहेत. फळे व भाज्या तसेच प्रोटिनयुक्त आहार घेण्याकडे सध्या डॉक्टरांचा कल आहे. वजन वाढू नये यासाठी तळलेले पदार्थ खाण्याचे टाळत आहेत.