शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:57 AM2021-02-20T04:57:46+5:302021-02-20T04:57:46+5:30
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर (माळवाडी) येथे शुक्रवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा ...
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर (माळवाडी) येथे शुक्रवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्या रोहिणी निघुते या वेळी उपस्थित होत्या.
आमदार विखे पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ३९१ वर्षांनंतरही तेवढ्याच उत्साहाने साजरी होणे याचे महत्त्व मोठे आहे. परंतु छत्रपतींच्या नावाने राजकारण करून सत्तेचे पद मिळवलेल्या शिवसेनेने महाराजांच्या जयंती दिनाचे महत्त्व कमी करण्याचा निर्णय करावा, याचे आश्चर्य वाटते. एकीकडे कोरोनाचे कारण सांगून जयंती दिनाच्या कार्यक्रमावर बंधने आणली जातात. मात्र, दुसरीकडे सतेत भागीदार असलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभात कोरोनाचे नियम तोडून गर्दी होते. राज्यात मंत्र्यांचे दौरे गर्दीतच सुरू आहेत हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाहीत का, असेही विखे म्हणाले.
-------------
हेच सरकार शेतकऱ्यांची वीज तोडत आहे
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ग्रामीण भागातील समस्या वाढल्या आहेत. कोरोनाच्या संकटात या सरकारने जनतेला कोणताही दिलासा दिला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून या देशातील प्रत्येक समाज घटकांना दिलासा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना केंद्र सरकार मदत करत आहे. पण केंद्राच्या नावाने टाहो फोडणारे महाविकास आघाडी सरकार आज शेतकऱ्यांची वीज तोडायला निघाले आहे. दिल्लीत आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या दिसत नाहीत, हे दुर्दैवच, असेही विखे म्हणाले.