जेऊर परिसरात बिबट्याकडून कुत्र्याची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:19 AM2020-12-22T04:19:45+5:302020-12-22T04:19:45+5:30

केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात बिबट्याकडून कुत्र्याची शिकार करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वनविभागाच्या ...

Dog hunting from leopards in the Jeur area | जेऊर परिसरात बिबट्याकडून कुत्र्याची शिकार

जेऊर परिसरात बिबट्याकडून कुत्र्याची शिकार

केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात बिबट्याकडून कुत्र्याची शिकार करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वनविभागाच्या वतीने नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन वनपरिमंडळ अधिकारी मनेष जाधव यांनी केले आहे.

जेऊरमधील चापेवाडी शिवारात दादासाहेब काळे यांच्या गट नंबर ९१४ मध्ये राहत असलेल्या घरातील पढवीतून कुत्र्याची शिकार करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि.२१) घडली. राळरास परिसरात दादासाहेब काळे यांची वस्ती असून, वस्तीलगत वनविभागाचे मोठे क्षेत्र आहे. या परिसरात हरिण, काळवीट व इतर वन्यप्राण्यांचा मोठा वावर आहे. काळे यांची मागील आठवड्यात शेळी फस्त करण्यात आली होती; परंतु त्यावेळी लांडग्याच्या हल्ल्यात शेळी मरण पावल्याचे समजण्यात आले होते; परंतु आजच्या घटनेवरून या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील महिन्यात ससेवाडी येथे बिबट्याने काळविटाची शिकार केली होती.

यापूर्वीदेखील जेऊर परिसरात अनेक वेळा बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे. इमामपूर घाटात कड्यावरून पडून बिबट्याचा मृत्यू झाला होता, तसेच इमामपूर येथील दोन शेतकऱ्यांना बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. बहिरवाडी येथील वाकी वस्तीवर बिबट्या विहिरीत पडलेला आढळून आला होता. या घटनांवरून जेऊर परिसरातील गर्भगिरीच्या डोंगररांगांमध्ये बिबट्याचे वास्तव्य असल्याचे वारंवार दिसून आले आहे.

घटनास्थळी वनपरिमंडळ अधिकारी मनेष जाधव, वनरक्षक श्रीराम जगताप, वनकर्मचारी संजय सरोदे, तुकाराम तवले यांनी भेट दिली. ठसे तपासून ते बिबट्याचेच असल्याचे स्पष्ट केले. यावेळी वन कर्मचाऱ्यांकडून परिसरात घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली.

---

चापेवाडी शिवारात बिबट्याचे वास्तव्य दिसून आले असून, नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. रात्रीच्या वेळी शेतात काम करीत असताना सोबत कोणाला तरी घेऊन जावे. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.

-मनेष जाधव,

वनपरिमंडळ अधिकारी

---

शेतीसाठी दिवसा वीज द्यावी

जेऊर परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याने महावितरण कंपनीने शेतीसाठी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांनी केली आहे.

Web Title: Dog hunting from leopards in the Jeur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.