व्हॉट्सअॅप ग्रुपने वाचविले साडेतीन हजार लोकांचे जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 04:21 PM2018-05-12T16:21:46+5:302018-05-12T16:34:45+5:30
तंत्रज्ञानाचा वापर करीत संगमनेरातील तुषार ओहरा हा तरुण ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ समूहाच्या माध्यमातून अनेकांचे जीव वाचविण्याचे काम करीत आहे.
शेखर पानसरे
संगमनेर (जि. अहमदनगर) : तंत्रज्ञानाचा वापर करीत संगमनेरातील तुषार ओहरा हा तरुण ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ समूहाच्या माध्यमातून अनेकांचे जीव वाचविण्याचे काम करीत आहे. त्याने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सर्वच रक्तगटांचे समूह स्थापन केले आहेत. यात संगमनेर बरोरबरच मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर यांसह अनेक शहरांतील सुमारे दोन हजारांहून अधिक रक्तदाते जोडले गेले आहेत. हा समूह रक्ताची गरज असणाऱ्यांसाठी वरदान ठरला असून, प्रत्येक प्रकारच्या रक्तगटाचे रक्त रुग्णास सहज आणि त्वरित उपलब्ध होत असल्याचे आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक जणांचे जीव वाचले आहेत.
३१ जुलै २०१५ रोजी तुषार ओहरा याने व्हॉट्सअॅपवर तीन समूह तयार करीत त्याला ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ असे नाव दिले. यात संगमनेरातील दोन तर बाहेरगावातील युवकांचा एक असे समूह तयार केले. या माध्यमातून तीनशे रक्तदाते जोडले गेले होते. जिथे कुणाला रक्ताची गरज भासल्यास हे रक्तदाते समूहावर संदेश पडताच लगेचच रक्तदानासाठी हजर होत. मात्र, दिवसेंदिवस रक्ताची मागणी वाढत गेल्याने रक्तदात्यांची संख्या कमी पडू लागली. यानंतर तुषारने राज्यभरातील रक्तदात्यांशी चर्चा करीत प्रत्येक रक्तगटानुसार वेगवेगळे समूह स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्व प्रकारच्या रक्तगटांच्या रक्तदात्यांची माहिती संकलित करण्याचे काम त्याने मित्र व सामाजिक काम करणाºयांच्या मदतीने केले. काही दिवसांचा अवधी गेल्यानंतर रक्तगटाच्या प्रकारानुसार ए+, ए-, बी+, बी-, एबी+, एबी-, ओ+, ओ- असे एकूण सोळा समूह तयार करण्यात आले. प्रत्येक प्रकारच्या रक्तगट असलेल्या समूहात तरुणांसह डॉक्टर, शिक्षक, वकील, चाकरमाने, सरकारी व खासगी क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी, लोकप्रतिनिधी, माध्यम समूहातील मित्रांचा सहभाग आहे.
रक्तदानासाठी महिलांचाही पुढाकार
‘रक्तदान श्रेष्ठ दान’ या समूहात पुरुषांबरोबरच संगमनेरातील महिलांचाही एक समूह सक्रिय आहे. यात प्रत्येक प्रकारच्या रक्तगटाच्या सुमारे शंभर मुली व महिला रक्तदात्या एकत्रित जोडल्या गेल्या आहेत. रुग्णास रक्ताची गरज भासल्यास या रक्तदात्या कुठलीही वेळ व काळ न बघता तत्काळ रक्तदानासाठी हजर होतात. यात स्वप्नाली तापडे, कीर्ती साबळे, पूनम लोहे यांसह अनेक मुली व महिलांचा पुढाकार आहे.