लॉकडाऊनमध्ये साईबाबांना अडीच कोटीची देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 03:08 PM2020-05-04T15:08:49+5:302020-05-04T15:09:50+5:30
कोरोनाच्या संकटामुळे १७ मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे़ गेल्या ४८ दिवसांच्या कालावधीत साईभक्तांकडून आॅनलाईनव्दारे साईबाबांना २ कोटी ५३ लाख ९७ हजार ७७८ रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाली असल्याची माहिती सोमवारी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
शिर्डी : कोरोनाच्या संकटामुळे १७ मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. गेल्या ४८ दिवसांच्या कालावधीत साईभक्तांकडून आॅनलाईनव्दारे साईबाबांना २ कोटी ५३ लाख ९७ हजार ७७८ रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाली असल्याची माहिती सोमवारी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
देशात व राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले. संस्थानने तत्पूर्वीच १७ मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद केले होते. साईबाबांचा महिमा व त्यांची शिकवणूक संपूर्ण जगात पोहचलेली असून त्यांचा भक्त वर्ग देशात व परदेशात मोठ्या प्रमाणात आहे. मंदिर बंदच्या काळात टाटा स्कॉय, संस्थान संकेतस्थळ व मोबाईल अॅप्सव्दारे थेट आॅनलाईन दर्शनाचा लाभ साईभक्त घर बसल्या घेत आहेत. यामध्ये टाटा स्कॉयवर सुमारे ३५ लाख साईभक्त अॅक्टीवेट असून १ लाख १२ हजार साईभक्तांनी संस्थानचे मोबाईल अॅप्स डाऊनलोड केलेले आहे. तर संकेतस्थळाला दररोज सुमारे ८ ते ९ हजार साईभक्त भेट देत आहे, अशी माहितीही डोंगरे यांनी दिली.
आॅनलाईन देणगीचा ओघ
साईबाबांचे मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद असले तरी ही साईभक्तांनी बाबांना दक्षिणा देण्याची परंपरा सुरु ठेवली आहे़ जगाच्या व देशाच्या कानाकोप-यातून साईभक्त संकेतस्थळाव्दारे व मोबाईल अॅप्सव्दारे आॅनलाईन देणगी संस्थानला पाठवत आहे. यातूनही ही ४८ दिवसात अडीच कोटींची देणगी मिळाल्याचे अरुण डोंगरे यांनी सांगितले.