जामखेडच्या बालिकेनं केले केसाचे दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 02:06 PM2018-10-03T14:06:49+5:302018-10-03T14:06:54+5:30
बारा वर्षीय कश्मीराने आपले लांबसडक व घनदाट असलेले २४ इंच लांबीचे केस दान केले.
जामखेड : बारा वर्षीय कश्मीराने आपले लांबसडक व घनदाट असलेले २४ इंच लांबीचे केस दान केले. कर्करोग पिडीतांना दान करण्यासाठी मुंबईतील ‘मदत चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेला टोप बनवण्यासाठी दान केले आहेत.
जामखेड येथील मार्बल व्यावसायिक सचिनकुमार व चेतना भंडारी या दाम्पत्याला चिराग व काश्मिरा ही दोन अपत्य. कश्मिरा ही जामखेड येथील खेमानंद इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत आहे. शालेय शिक्षण ती विशेष प्राविण्याने उत्तीर्ण होत आहे. कश्मिराला काहीतरी दान करण्याची इच्छा होती. कर्करोगग्रस्तांना केमोथेरपीच्या उपचारामुळे डोक्यावरचे केस गमवावे लागतात. या उपचारामुळे त्यांच्या डोक्यावर पुन्हा केस उगवणे अवघड असते. त्यामुळे अशा रुग्णांसाठी मुंबईतील ‘मदत चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था कार्य करते. या संस्थेच्या वतीने त्यांना दान मिळालेल्या केसांचा टोप बनवून या रूग्णांना देण्यात येतात.
कश्मिराने आपल्या आईवडिलांकडे आपले लांबसडक, काळेभोर २४ इंच लांबीचे केस दान करण्याचा हट्ट धरला. आई-वडीलांनी तिच्या सामाजिक कार्याला साथ दिली. २४ इंच लांबीचे केस कापून घेतले. व्यवस्थित पॅकिंग करून मुंबई येथील मदत चॅरिटेबल ट्रस्टला पाठवले.