कष्टाने कमावलेली संपत्ती केली गावाला दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 03:24 PM2019-11-17T15:24:55+5:302019-11-17T15:25:24+5:30
गावाच्या उपकारातून उतराई होण्यासाठी माधवबाबा शिंदे यांनी गावात मने जुळणारी वास्तु उभी करण्यासाठी स्वत:जवळील १ लाख ३८ हजार रुपये दान केले.
यमन पुलाटे ।
बाभळेश्वर : वयाच्या पाचव्या वर्षी दुर्गापूरला आईसोबत आलेला मुलगा गावात रमला. गावात राहून ग्रामदैवत आनंदबाबाची सेवा करत मोठा झाला. गावाने मला खूप दिले. मी गावाला काय देऊ? हा विचार कायमच मनात असायचा. गावाच्या उपकारातून उतराई होण्यासाठी माधवबाबा शिंदे यांनी गावात मने जुळणारी वास्तु उभी करण्यासाठी स्वत:जवळील १ लाख ३८ हजार रुपये दान केले. या दानातून गावात सांस्कृतिक भवन आणि भजन मंडप उभा राहणार आहे.
आनंदबाबाजवळ तू रहा. मंदिरात सेवा कर, असे सांगून माउली पाच वर्षाच्या मुलाला सोडून गेली. गावातील पुलाटे, मनकर, जाधव, रोकडे यांनी या मुलाला आधार दिला. आनंदबाबाचे भक्त चिमणबाबा आणि भक्तबाबा यांनी दिलेल्या प्रेमातून माधवबाबा घडत होते. मंदिरात सेवा करत माधवबाबा मोठे झाले. चिमणबाबांने टेलरिंग शिकविले. जाधव परिवाराने गोदान केले. यातून उभ्या राहिलेल्या माधवबाबा यांनी बचत करत तब्बल १ लाख ३८ हजार रुपये जमवले. ती संपूर्ण रक्कम गावाला दान दिली. नुकतेच सरला बेटाचे मठाधिपती मंहत रामगिरी महाराज यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले.
बालपणापासून ज्या गावाने प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकी दिली. माधवबाबा शिंदे यांनी १ लाख ३८ हजार ही आपल्या आयुष्याची पुंजी संपूर्ण गावाला दान केली. यातून भव्यदिव्य सभामंडप आणि कीर्तन मंडप उभा राहावा ही त्यांची अपेक्षा आहे.
गावाने प्रेम दिले. या प्रेमातून मी उभा राहिलो. गावातील जाधव, पुलाटे परिवारांनी दिलेल्या प्रेमामुळे मी उभा राहिलो. चिमणबाबांनी शिकवलेले टेलरिंगचे काम आणि यातून आलेला पैसा मी गावासाठी दिला. आज ख-या अर्थाने गावासाठी काहीतरी करू शकलो याचे समाधान मोठे आहे, असे माधवबाबा शिंदे यांनी सांगितले.