प्रपंच उद्ध्वस्त करू नका, शेतात पाय ठेवू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:23 AM2021-02-24T04:23:19+5:302021-02-24T04:23:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी नव्याने हंगा व सुपा गावच्या शिवारातील शेतजमीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी नव्याने हंगा व सुपा गावच्या शिवारातील शेतजमीन भूसंपादन करण्यासाठी हरकती व सुनावणीसाठी संबंधित शेतकऱ्यांना मंगळवारी (दि.२३) बोलावण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. शेतकरी कुटुंबातील महिलांनी यावेळी आमचा प्रपंच उद्ध्वस्त करू नका. आमच्या शेतात पाऊल ठेऊ देणार नाही, अशी प्रखर भूमिका मांडत अधिकाऱ्यांना इशारा दिला.
प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी हंगा व सुपा येथील शेतकऱ्यांना हरकती घेण्यासाठी ही संधी आहे. कोणत्याही विकासासाठी उद्योगधंदे वाढले, तर रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध होतात. तरुणांना रोजगार, उद्योग व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होते. तर नवीन भूसंपादन करताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, सारिक उंडे, मंडलाधिकारी शिवाजी शिंदे, बाळासाहेब कुसमुडे, अशोक डोळस उपस्थित होते.
याावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शेती करणाऱ्या कुटुंबातील सदस्य जितीन साठे यांनी सांगितले की, ज्यांच्या फूल शेतीची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली. त्या शेतीवर तीन कुटुंबातील १५ माणसे अवलंबून आहेत. तेथे दोन एकर फुलशेती व तीन एकरवर भाजीपाला होतोय. असे क्षेत्र हिरावून घेऊ नका, अशी विनंती केली. हीच शेती आमचा उद्योग असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकाश दळवी या तरुणाने १९९१ मध्ये पहिल्यांदा एमआयडीसीसाठी अधिग्रहण केली. आता पुन्हा आमची शेती घेणार आहेत. आमच्या कुटुंबाने किती वेळा त्याग करायचा? आम्हाला आमचा गाव हवाय. त्यामुळे आम्हाला भूमिहीन करून शेतकऱ्यांची हेळसांड करू नका, असे आवाहन केले.
सुप्यातील येणारे कुटुंबीय दूध व्यवसायिक आहे. त्यांचे बागायत क्षेत्र गेले, तर व्यवसाय संपला असल्याची भीती अनिल येणारे, नाना येणारे, संतोष येणारे यांनी सांगितले.
.....
सरकार कुणाची आई होऊ शकत नाही
मंगल शिंदे यांनी शेती ही आमची माय आहे. सरकार कुणाची आई होऊ शकत नाही. मुलावर मी अन्याय होऊ देणार नाही. जिद्दीने प्रपंच उभा केलाय, असे सांगून ज्याला शेती द्यायची नाही त्याला आडकाठी करू नये, असे आवाहन केले. सरकार, पोलीस यंत्रणा यांना आम्ही घाबरत नाही, असेही ठणकावले.
छाया साठे यांनी आमची २० एकर शेती गेल्यावर पाच मुलांना घेऊन कुठे जाणार? तीन मुलींची लग्ने कशाच्या आधाराने करणार? मुलांच्या नोकरीची हमी कोण घेणार? असे प्रश्न विचारून आमचे पालन पोषण करणाऱ्या शेतीत कुणालाच पाऊल ठेवू देणार नाही, असे सुनावले.
.....
शेतकऱ्यांच्या लेखी, तोंडी हरकतीच्या नोंदी घेतल्या आहेत. ज्यांना नोटीस मिळाल्या नाहीत. त्यांनाही संधी दिली जाईल. हरकती, सुनावणी याचा अहवाल करून तो शासनाकडे पाठवला जाईल.
-सुधाकर भोसले, उपविभागीय अधिकारी
...
शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्या आहेत. जवळपास ३०० हरकती प्राप्त झाल्या आहेत. या सर्व हरकतींचा विचार करणार आहोत. आजच्या सुनावणी दरम्यान घेतलेल्या हरकती शेतकऱ्यांचे म्हणणे याचा अहवाल शासनाकडे पाठवला जाईल.
-नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, नाशिक विभाग