विकासकामांतून मते मिळत नाहीत, पालकमंत्री मुश्रिफांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 04:11 PM2022-03-02T16:11:16+5:302022-03-02T16:14:21+5:30
अहमदनगर : केवळ विकासकामे करून मते मिळत नाहीत. मते मिळण्यासाठी लोकांची वैयक्तिक कामे करावी लागतात. लोकांची वैयक्तिक कामे करण्याकडे ...
अहमदनगर : केवळ विकासकामे करून मते मिळत नाहीत. मते मिळण्यासाठी लोकांची वैयक्तिक कामे करावी लागतात. लोकांची वैयक्तिक कामे करण्याकडे या जिल्ह्यातील नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे, अशी खंत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे व्यक्त केली.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी येथील राष्ट्रवादी भवनात नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांचा मंगळवारी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, आमदार अशुतोष काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, अविनाश अदिक, सभापती क्षितीज घुले, शहराध्यक्ष माणिक विधाते, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय काेळगे, महिला आघाडीच्या अध्यक्षा मंजूषा गुंड, घनश्याम शेलार, आदी उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे चांगलेच कान टोचले. ते म्हणाले की, शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. केवळ विकासकामे करून मते मिळत नसतात, हा आपला अनुभव आहे. एखाद्या गावासाठी रस्ता केल्यास गावाची सोय होते. परंतु, त्या गावातील गोरगरिबांची वैयक्तिक कामे मात्र होत नाहीत. ती कामे लोकप्रतिनिधींनी केली पाहिजेत. अशा प्रकारची कामे केल्यास संपर्क वाढतो. एखाद्याला ठेच आली तरी ती कळाली पाहिजे, एवढा आपला संपर्क असला पाहिजे, असे मुश्रीफ म्हणाले.
नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणाची अडचण आहे. ही अडचण पुढील दोन दिवसांत दूर होऊन येत्या जून महिन्यात नगरपालिकांच्या निवडणुका होतील. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागा. नगरपालिकेची निवडणूक घटक पक्षांना सोबत घेऊन लढवायची की स्वतंत्र, याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा. गरज पडल्यास आम्हाला सांगा. हिमालयासारखे तुमच्या पाठीशी उभे राहू, असा विश्वास मुश्रीफ यांनी दिला. जिल्हाध्यक्ष फळके यांनी नगरपालिका क्षेत्रातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली. यावेळी पाथर्डी, शेवगाव, राहुरी, देवळाली, श्रीरामपूर नगरपालिकांची माहिती देण्यात आली.
फेव्हिकॉल का जोड है तुटेगा नही
सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची भक्कम एकजूट आहे. ते तिन्ही पक्ष म्हणजे फेव्हिकॉलचा जोड आहे. कुणी कितीही प्रयत्न केले तरी हे सरकार कदापि तुटणार नाही, असे मुश्रीफ म्हणाले.