लॉकडाऊन संपला तरी लहान मुलांना बाहेर सोडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:18 AM2021-05-17T04:18:19+5:302021-05-17T04:18:19+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाने कहर माजविला आहे. दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. तिसऱ्या लाटेत ...
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाने कहर माजविला आहे. दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. तिसऱ्या लाटेत तर १८ वर्षांखालील मुलांना सर्वाधिक धोका सांगितला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात १०० बेडचे कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांमध्ये शिरकाव झालेला नव्हता. मात्र, पहिल्या लाटेच्या तुलनते दुसऱ्या लाटेत चारपटीने रुग्ण वाढलेले आहेत. लहान मुलांना कोरोनाची बाधा होत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. जसजशा कोरोनाच्या लाटांवर लाटा आदळत आहेत, तसा कोरोना स्ट्रेन घातक होत चालला आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपला तरी लहान मुलांना घराबाहेर न सोडणे फायद्याचे ठरणार आहे. घरगुती कार्यक्रमाच्या नावाखाली शेजारीपाजारी, रस्त्यावर खेळणाऱ्या फिरणाऱ्या मुलांना कोरोना होत आहे. घरात कुणीही बाधित नसताना यातून लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे. यापूर्वी कुटुंबातील सदस्य बाधित झाला तरी लहान मुलांना कोरोना झाला नव्हता; परंतु दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये ताप येणे, जुलाब होणे उलट्या होणे, यासारखी लक्षणे आढळून येत आहेत. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेने पूर्वतयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बालरोग तज्ज्ञांची बैठक पार पडली. या बैठकीत तिसऱ्या लाटेची तयारी करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून, लहान मुलांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण वाढल्यास काय उपाययोजना कराव्या लागतील, याबबात चर्चा करण्यात आली असून, दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत.
.....
जिल्हा रुग्णालयात २० पीआयसीयू सेंटर उभारणार
कोरेानाबाधित लहान मुलांवरील उपचारासाठी आयसीयू सेंटर जिल्ह्यात कुठे नाही. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची गरज भासू शकते, यासाठी जिल्हा रुग्णालयात २० खाटांचे पीआयसीयू सेंटर उभारण्यात येणार असून, १०० बेडचे कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील दोन आठवड्यांत हे सेंटर कार्यान्वित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
...
जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांची ऑनलाइन बैठक
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बालरोगज्ज्ञांची बैठक येत्या २० मे रोजी ऑनलाइन घेण्यात येणार आहे. लहान मुलांमध्ये आढळणारी लक्षणे, त्यासाठी उपचार पद्धतीने ठरविणे, याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
...
अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण
लहान मुलांमध्ये कोणती लक्षणे आहेत, त्यानुसार त्यांना उपचारासाठी कुठे पाठवायचे, याबाबतचे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना ऑनलाइन प्रशिक्षणही दिले जाणार आहे. अनेक गावांत आरोग्य सेवा उपलब्ध नाहीत, अशा परिस्थितीत लहान मुलांना उपाचारासाठी कुठे पाठवायचे याबाबतच्या सूचना केल्या जाणार आहेत.
....
लस येईपर्यंत काळजी घ्यावी लागणार आहे.
- पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे. तिसऱ्या लाटेबाबत सांगितले जात आहे; परंतु प्रत्यक्षात काय परिस्थिती निर्माण होते, याची माहिती नाही; परंतु लहान मुलांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार घेणे आवश्यक आहे.
- डॉ. नितीन लोणारे, बालरोगतज्ज्ञ, नेवासा
....
- पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांमध्ये साधारणपणे ताप, जुलाब आणि उलटी होणे, यासारखी लक्षणे आढळून येत आहेत. तिसऱ्या लाटेतील धोका ओळखून उपाययोजना करण्याबाबत नुकतीच बैठक झाली. या बैठकीत लहान मुलांसाठीच्या आरोग्य सुविधा वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.
- डॉ. सचिन वाहाडणे, बालरोगतज्ज्ञ, सचिव, आयएमए
.....
ही आहेत लक्षणे
-लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, जुलाब, उलट्या तसेच घशात व नाकात खवखवणे अशी लक्षणे आढळून येत आहेत. काही मुलांना अंगावर पुरळ येणे, ताप वाढणे ही लक्षणेही आढळून येत असून, ही लक्षणे कोरोना किंवा पोस्ट कोरोनाची असू शकतात.
- याशिवाय वास न येणे, जेवन न जाणे, थकवा येणे, ही लक्षणे कोरोनात आढळून येत आहेत. ही लक्षणे आढळून आल्यास वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ला घेऊन आवश्यक असलेल्या तपासण्या करणे गरजेचे आहे. कारण ही लक्षणे इतर आजारांचीही असू शकतात; परंतु खात्री करून तातडीने उपाचार घेणे आवश्यक आहे.