दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:35 AM2021-05-05T04:35:01+5:302021-05-05T04:35:01+5:30
अहमदनगर : लसीकरणाचा साठा संपल्याने अनेकांना दुसरा डोस मिळणे कठीण झाले आहे; परंतु निर्धारित कालावधीपेक्षा दुसऱ्या डोसला उशीर झाला ...
अहमदनगर : लसीकरणाचा साठा संपल्याने अनेकांना दुसरा डोस मिळणे कठीण झाले आहे; परंतु निर्धारित कालावधीपेक्षा दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरून जाऊ नये. पहिल्या डोसपासून २८ ते ५६ दिवसांपर्यंत दुसरा डोस घेता येऊ शकतो, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे.
नगर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. तेव्हापासून अनेक फ्रंटलाइन वर्कर, तसेच ज्येष्ठ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. पहिला डोस अनेकांना सहजासहजी मिळाला. मात्र, दुसरा डोस मिळण्यात आता अडचणी येत आहेत. मागणीएवढा लसीचा पुरवठा होत नसल्याने अनेक केंद्रांवर हवी तेवढी लस उपलब्ध होत नाही. परिणामी दुसरा डोस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसह फ्रंटलाइन वर्कर यांनाही चकरा माराव्या लागत आहेत. दुसरा डोस नेमका किती दिवसांनी घ्यावा, दिलेल्या कालावधीत हा डोस मिळाला नाही तर काय? याबाबत अनेक नागरिक गोंधळलेले आहेत. त्यामुळे ‘लोकमत’ने तज्ज्ञांशी चर्चा करून याबाबत काही माहिती घेतली आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस साधारण २८ दिवसांनंतर घ्यायचा आहे. यात प्रथम कोविशिल्ड लस घेतली असेल तर याचा दुसरा डोस २८ ते ५६ दिवसांच्या कालावधीत घ्यायचा आहे. जर कोव्हॅक्सिन घेतली असेल तर याचा दुसरा डोस २८ ते ४२ दिवसांनी घ्यायचा आहे. काही कारणास्तव हा कालावधी उलटून आठ-दहा दिवस झाले तरी ही लस घेता येते. त्याने घाबरून जाण्यासारखे काही नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
--------------
दुसरा डोस कधी घ्यावा
कोविशिल्ड
पहिल्या डोसनंतर २८ ते ५६ दिवसांच्या कालावधीत.
---------------
कोव्हॅक्सिन
पहिल्या डोसनंतर २८ ते ४२ दिवसांच्या कालावधीत.
------------------
पहिला डोस झालेले आरोग्यसेवक-२५९१३
दुसरा डोस झालेले आरोग्यसेवक- १६५६२
पहिला डोस झालेले फ्रंटलाइन वर्कर्स- ३५७९५
दुसरा डोस झालेले फ्रंटलाइन वर्कर्स - २२०११
पहिला डोस झालेले ४५ वर्षांपुढील नागरिक-३६१२८३
दुसरा डोस झालेले ४५ वर्षांपुढील नागरिक - ५२७६१
--------------
सध्या दुसऱ्या डोसलाच प्राधान्य
सध्या मोठ्या प्रमाणात लसींचा तुटवडा भासत असल्याने नागरिकांची मोठी गर्दी लसीकरण केंद्रांवर होत आहे; परंतु शासनाने सध्या ज्यांनी पहिला डोस घेतला त्यांना दुसरा डोस घेण्याबाबत प्राधान्य दिले आहे. सध्या अनेक केंद्रांवर केवळ दुसराच डोस देण्यात येत आहे. दुसऱ्या डोसचे सर्व लसीकरण उरकल्यानंतरच इतरांना पहिला डोस सुरू केला जाईल. नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनीही अशाच सूचना दिल्या आहेत.
---------------
पहिला डोस कोविशिल्डचा घेतला असेल तर याचा दुसरा डोस २८ ते ५६ दिवसांच्या कालावधीत घ्यायचा आहे. जर कोव्हॅक्सिन घेतली असेल तर याचा दुसरा डोस २८ ते ४२ दिवसांनी घ्यायचा आहे. काही कारणास्तव हा कालावधी उलटून आठ-दहा
दिवस झाले तरी ही लस घेता येते. त्याने घाबरून जाण्यासारखे काही नाही.
- डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्यचिकित्सक