केडगावच्या पाण्यात वाटेकरी नकोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:18 AM2021-03-22T04:18:57+5:302021-03-22T04:18:57+5:30
केडगाव : २५ वर्षांचा विचार करून कार्यान्वित करण्यात आलेल्या केडगाव पाणी योजनेत (फेज १) शहरातील इतर भागांचा समावेश करू ...
केडगाव : २५ वर्षांचा विचार करून कार्यान्वित करण्यात आलेल्या केडगाव पाणी योजनेत (फेज १) शहरातील इतर भागांचा समावेश करू नये, अशी केडगावकरांची मागणी आहे. यावरून मनपात झालेल्या वादाचे केडगावात पडसाद उमटत असून ३० वर्षे पाणीटंचाईची साडेसाती सोसलेल्या नागरिकांच्या पाण्यात वाटेकरी न करता कल्याण रस्ता परिसराला स्वतंत्र योजना सुरू करावी, असा सूर उमटत आहे.
कल्याण रस्ता परिसरातील वसाहतींचा झपाट्याने विस्तार होत आहे. येथील लोकसंख्या आता २० हजारांच्या घरात गेली असून सध्या दोन हजार लोकसंख्येला पुरेल इतके पाणी त्यांना मिळत आहे. आठवड्यातून एकदाच पाणी मिळत असल्याने व त्यासाठी पर्यायी व्यवस्था होत नसल्याने त्या भागातील नगरसेवक संतप्त झाले. यावरून मनपाच्या बैठकीत शिवसेना नगरसेवक व केडगावचे भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांच्यात वादंग झाले. त्याचे थेट पडसाद केडगाव उपनगरात उमटत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नेते, नागरिक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
केडगावचा पाणीप्रश्न १९८० पासून तीव्र बनला आहे. तेव्हापासून ते २०१० पर्यंत म्हणजे जवळपास ३० वर्षे केडगावकरांनी तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन केल्या. आठवड्यातून एकदाच पाणी हीच केडगावची ओळख बनली.
माजी महापौर संदीप कोतकर यांच्या प्रयत्नांमुळे २००८ मध्ये केडगावला सुधारित पाणी योजना मंजूर झाली. ती कार्यान्वित होता-होता चार वर्षे लागले. आता कुठे केडगावला दोन ते तीन दिवसाआड नियमित पाणी मिळत आहे. ही योजना पुढील २५ वर्षांचा विचार करून तयार करण्यात आली असली तरी त्यातील १० वर्षांचा कार्यकाळ आता संपला आहे. केडगावचा विस्तारही झपाट्याने वाढत असून नव्या वसाहतींना अद्याप योजनेचे पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत केडगाव योजनेतून शहरातील इतर भागांना पाणी दिले तर त्याचा विपरीत परिणाम पाणी वितरणावर होऊन केडगावात पुन्हा आठवड्यातून एकदा पाणी मिळेल, अशी स्थिती तयार होईल. यामुळेच केडगावच्या योजनेचे पाणी शहरातील इतर भागाला देण्यास केडगावकरांचा तीव्र विरोध सोशल मीडियातून प्रकट झाला आहे.
---
केडगावची सद्य स्थिती..
पाणी योजना सुरू - २००८,
लोकसंख्या- १ लाख,
एकूण नळजोड- ८५००,
किती पाणी मिळते - दोन ते तीन दिवसाआड,
पाण्याची साठवण क्षमता - ४० लाख लिटर.
---
मोठ्या संघर्षातून केडगावला सुधारित पाणी योजना सुरू झाली. येथे तीन-चार दिवसांनी पाणी मिळते. ते दिवसाआड करावे, अशी मागणी असतानाच केडगावच्या हक्काचे पाणी इतर भागाला देण्याची मागणी होते. त्यास आमचा विरोध आहे.
-मनोज कोतकर, नगरसेवक
---
कल्याण रस्ता परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. पाणी मात्र २० वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून मिळते. आम्हांला १० दिवस पाणी मिळत नाही. आम्ही केडगावच्या वाट्याचे पाणी मागत नाही. मात्र, आठवड्यातून एकदा दिले तरी आमची तहान भागेल.
-सचिन शिंदे, नगरसेवक, शिवसेना
---
शिवसेना प्रवक्त्याकडून भाजप नगरसेवकाचे कौतुक
शिवसेनेचे प्रवक्ते रमेश परतानी यांनी केडगाव पाणी संदर्भात भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले. केडगावच्या शिवसेना नगरसेवकांनी केडगावचे हित पाहून कोतकर यांना साथ द्यायला हवी, अशी भूमिका त्यांनी सोशल मीडियातून मांडली. त्यांनी आपल्या भागातील पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, शाम नळकांडे यांचेही अभिनंदन केले.