नको मित्रा येऊ रस्यावर.. तहसीलदारांची काठी बसेल पाठीत...!; श्रीगोंद्यातील तहसीलदार , पोलीस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:29 AM2020-03-24T11:29:57+5:302020-03-24T11:29:57+5:30
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने जमावबंदीचे आदेश केले आहेत. असे असताना श्रीगोंदा शहरात काही मोटारसायकलस्वार मोकाटपणे फिरतात. अशा मोकाटांच्या माथी काठी मारण्याची भूमिका श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी घेतली आहे.
बाळासाहेब काकडे/
श्रीगोंदा : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने जमावबंदीचे आदेश केले आहेत. असे असताना श्रीगोंदा शहरात काही मोटारसायकलस्वार मोकाटपणे फिरतात. अशा मोकाटांच्या माथी काठी मारण्याची भूमिका श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी घेतली आहे. त्यामुळे मोकाट फिरणा-यांना तहसीलदारांची चांगलीच दहशत बसली आहे.
श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी श्रीगोंद्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट केली आणि नुसते कागदी आदेश देऊन मोकळे न होता कायदा मोडणारांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी एक पाऊल पुढे आहेत. तहसीलदार महेंद्र महाजन हे सकाळी दहा वाजता रस्यावर येऊन जमावबंदीचा आढावा घेतात. चार चाकी वाहने मोटारसायकलीची तपासणी करतात. यामध्ये काही मोकाट फिरणारे आढळले तर त्यांना चांगला चोप देतात. त्यांना पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व पोलिसही चोप देण्यासाठी मदत करतात. त्यामुळे श्रीगोंद्यात मोकाट फिरणा-यांना आळा बसला आहे. तहसीलदार महेंद्र महाजन यांची काठी कधी पाठीत बसेल याचा नेम नाही. त्यामुळे रस्त्यावर येणारांची संख्या कमी झाली आहे.
कारोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी शासनाने राज्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे सर्वांनी घरात बसणे आवश्यक आहे. तरी काही महाभाग कारण नसताना रस्त्यावर येतात. चौकात बसतात. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजत नाही म्हणून अशा नाठाळांच्या माथी ना विलाजाने काठी मारावी लागत आहे.
-महेंद्र महाजन, तहसीलदार, श्रीगोंदा.