'काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे'; उद्धव ठाकरेंचा संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद
By शेखर पानसरे | Published: September 8, 2023 01:47 PM2023-09-08T13:47:45+5:302023-09-08T13:48:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : पावसाने ओढ दिल्याने राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : पावसाने ओढ दिल्याने राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी (दि.८) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरातील वडझरी बुद्रुक आणि वडझरी खुर्द येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला.
'शासन आपल्या दारी आले का'? असे माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विचारले. दुष्काळाची परिस्थिती असताना निळवंडे धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडावे. शेतातील पीके करपून गेली आहेत. त्यामुळे पीक विम्याच्या लाभ मिळावा,अशी मागणी शेतकऱ्यांनी करत शेतीसंबंधी अनेक समस्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या.
'काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे' असा धीर ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. खासदार संजय राऊत, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उत्तर नगर जिल्हाप्रमुख मुजीब शेख, संगमनेर तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी, उपशहर प्रमुख विकास डमाळे आदी यावेळी उपस्थित होते.