विंचरणा नदीवरील बंधा-याचे दोन दरवाजे गेले वाहून; २० दशलक्ष घनफूट पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:58 PM2017-12-11T13:58:11+5:302017-12-11T14:48:53+5:30
जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला होता. मात्र, अतिदाबामुळे या बंधा-यातील दोन लोखंडी दरवाजे तुटून वाहून गेले. यामुळे बंधा-यातील निम्मे पाणी वाहून गेले असून, अद्याप पाणी वाहतच आहे. बंधा-याचे दरवाजे वीस फूट अंतरावर सापडले आहेत.
जामखेड : तालुक्यातील वंजारवाडी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला होता. मात्र, अतिदाबामुळे या बंधा-यातील दोन लोखंडी दरवाजे तुटून वाहून गेले. यामुळे बंधा-यातील निम्मे पाणी वाहून गेले असून, अद्याप पाणी वाहतच आहे. त्यामुळे हा बंधारा रिकामा होतो की काय, अशी शंका उपस्थित झाली आहे. बंधा-याचे दरवाजे वीस फूट अंतरावर सापडले आहेत.
वंजारवाडी ग्रामस्थांनी जलसंपदा खात्याच्या अधिका-यांना दूरध्वनीवरून बंधा-याचे दरवाजे वाहून गेल्याची माहिती दिली. पण ते हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे गेल्याचे सांगण्यात आले. ४० दशलक्ष घनफूट क्षमतेचा असलेला हा बंधारा वंजारवाडी व परिसरातील शेतक-यांसाठी वरदान ठरलेला आहे. या बंधा-यामुळे परिसरातील हजारो एकर क्षेत्र बारामाही ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे. दरम्यान रविवारी रात्रीपासून निम्यापेक्षा जास्त पाणी बंधा-यातून वाहून गेले आहे. अधिकारी लक्ष देत नसल्याने शेतक-यांनीच क्रेन बोलावले असून त्याद्वारे दरवाजे बसवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.