शिर्डीत रक्तरंजित पहाट; डबल मर्डर आणि एका हाफ मर्डरने साईनगरी हादरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 11:17 IST2025-02-03T11:16:48+5:302025-02-03T11:17:31+5:30
या घटनांमुळे शिर्डीत तणावपूर्ण शांतता आहे.

शिर्डीत रक्तरंजित पहाट; डबल मर्डर आणि एका हाफ मर्डरने साईनगरी हादरली
प्रमोद आहेर, शिर्डी : शिर्डीत आज पहाटे झालेल्या भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेला तर अत्यवस्थ असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेतील मयत झालेले सुभाष घोडे हे मंदिरातील कर्मचारी ड्युटीवर येत होते, तर नितीन शेजुळ हे सुरक्षा कर्मचारी ड्युटी संपवून घरी निघाले होते. कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते. त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाला. पहाटे चार ते साडेपाच दरम्यान विमानतळ रोडला विविध ठिकाणी या घटना घडल्या.
मोटार सायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशाने या तिघांना अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली. इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तिघांवर चाकूने असंख्य वार केले. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.
पोलिसांनी अपघात असल्याचे सांगून घटना गांभीर्याने न घेतल्याने मृतांचे नातेवाईक व नागरिकांनी संताप व्यक्त केला. घोडे यांच्या नातेवाईकांनी आरोपींना जोवर अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे. या घटनांमुळे शिर्डीत तणावपूर्ण शांतता आहे.
दरम्यान, सकाळी घटनास्थळी आलेल्या माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे सांगितले. "याबाबत साडेपाच वाजता कॉन्स्टेबलला कळवल्यानंतर त्यांनी बॉडी रुग्णालयात आणून अपघाताची नोंद केली. ज्या पोलिसाला अपघात व खून यातील फरक कळत नाही त्याला पोलिसात राहण्याचा अधिकार नाही. त्याच्या निलंबनासाठी पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे, पोलीस निरीक्षक यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. शिर्डीची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील. येथील पोलीस व्हीआयपी दर्शन प्रोटोकॉलमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे प्रोटोकॉलसाठी स्वतंत्र पोलीस देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रह धरून अनेक दिवसांचा हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येईल," असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी रुग्णालयात येऊन मयताच्या नातेवाईकांची भेट घेतली. याशिवाय शिर्डीचे ताराचंद कोते, सचिन चौघुले, कैलास कोते, शिवाजी गोंदकर, अनिता जगताप, विजय जगताप, कैलास कोते आदींनी रुग्णालयात येऊन नातेवाईकांची भेट घेतली. अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची त्यांनी मागणी केली.