मोदींची दुटप्पी भूमिका; तेव्हा अण्णा हजारेंची प्रशंसा, आता मात्र थट्टा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 11:26 AM2019-02-04T11:26:20+5:302019-02-04T11:32:13+5:30
मोदींसह भाजपाचा दुतोंडीपणा उघड
- सुधीर लंके
अहमदनगर : अण्णा हजारे यांनी ‘लोकपाल’ कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरल्याने नरेंद्र मोदी सरकार उघडे पडून भाजपची अडचण झाली आहे. मोदी यांनी २०१३ मध्ये अण्णांच्या आंदोलनाची प्रशंसा करणारे ‘टिष्ट्वट’ केले होते. आता मात्र त्यांच्यासह सर्वच भाजप नेत्यांनी मौन धारण केले आहे. जिल्ह्यातील पालकमंत्री राम शिंदे एरव्ही अण्णांच्या भेटीला जातात. मात्र, त्यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे खासदार, आमदारही मौनात गेले आहेत.
Am very proud of the positive & proactive role played by BJP MPs under leadership of @SushmaSwarajbjp & @arunjaitley in passing Lokpal Bill.
— Narendra Modi (@narendramodi) December 18, 2013
कॉंग्रेस सरकार सत्तेत असताना ‘लोकपाल’ कायद्यासाठी अण्णा हजारे यांनी आंदोलन केले. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी त्यांची प्रशंसा केली होती. १८ डिसेंबर २०१३ रोजी जेव्हा ‘लोकपाल’चे बिल राज्यसभेत मंजूर झाले त्यावेळी मोदी यांनी ‘टिष्ट्वट’ करुन आनंद व्यक्त केला होता. ‘लोकपालचे बिल पास होणे हा अण्णांची जिद्द व त्यांच्या मेहनतीचा एकप्रकारे सन्मान आहे. त्यांच्या तब्येतीला शुभेच्छा’ असे ते या टिष्ट्वटमध्ये म्हणाले होते. ‘लोकपाल’चे बिल मंजूर करण्यासाठी सुषमा स्वराज व अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या खासदारांनी सकारात्मक भूमिका पार पाडली त्याबद्दल मला अभिमान आहे’ असेही टिष्ट्वट त्यांनी केले होते. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी अण्णा हजारे यांची प्रशंसा करणारी भाषणे केली होती.
Passage of Lokpal Bill is a fitting tribute to the struggle & determination of Shri Anna Hazare. I pray for his good health.— Narendra Modi (@narendramodi) December 18, 2013
सत्तेत आल्यानंतर मात्र मोदी यांनी अण्णांना दुर्लक्षित केले. कॉंग्रेस सरकार अण्णांच्या पत्राची दखल घेत त्यांना उत्तर कळवत होते. मोदी यांनी मात्र पत्रांना उत्तरही दिले नाही. याऊलट उपोषणाच्या पत्राला उत्तर देताना ‘शुभेच्छा’ असा संदेश पाठविला. ‘लोकपाल’ची सर्व प्रक्रिया कॉंग्रेस सरकारच्या काळात पूर्ण झालेली आहे. मनमोहनसिंग सरकारने ‘लोकपाल’ नियुक्तीसाठी जाहिरात देखील दिली होती. मोदी यांना केवळ अर्जांची छाननी करुन ‘लोकपाल’ नियुक्त करावयाचा होता. मात्र ती अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे भाजपची अडचण झाली आहे.
काँग्रेस, शिवसेना, मनसे मैदानात
अण्णांच्या यापूर्वीच्या आंदोलनात घुसखोरी करुन भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. आता ते मौनात गेले आहेत. अण्णांच्या आंदोलनात आता इतर पक्षांनी उडी घेतली आहे. अण्णांच्या प्रकृतीबाबत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज ठाकरे हे सोमवारी अण्णांच्या भेटीला येत आहेत. विरोधी पक्षनेते कॉंग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे, माजी महसूल मंत्री व कॉंग्रेसचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब थोरात यांनीही अण्णांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे हे आंदोलन आता पुन्हा देशभर पेटण्याची चिन्हे आहेत.
राहुल गांधी यांच्या भूमिकेकडे लक्ष
अण्णांच्या उपोषणाबाबत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष आहे. कॉंग्रेसने ‘लोकपाल’ची सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यामुळे कॉंग्रेसही आता अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करु शकते, असे बोलले जाते. राज्यातील काही कॉंग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांच्याशी संपर्क केल्याचे समजते. आगामी काळात राहुल गांधीही कदाचित अण्णांची भेट घेऊ शकतात.