काढणीपश्चात तंत्रज्ञानाद्वारे उत्पन्न दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:20 AM2021-04-27T04:20:31+5:302021-04-27T04:20:31+5:30
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाच्या आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत फळे व भाजीपाला पिकांचे काढणीनंतरचे ...
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाच्या आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत फळे व भाजीपाला पिकांचे काढणीनंतरचे व्यवस्थापन या विषयावरील तीन आठवड्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पी. जी. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून ए. के. सिंग यांनी मार्गदर्शन केले. सिंग म्हणाले, शेतकऱ्याच्या शेतावर तयार झालेला माल काही कारणास्तव बाजारात पोहोचेपर्यंत उशीर होतो. त्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या मालाचे काढणीपश्चात तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि विपणन याविषयी जागृती करण्याची गरज आहे. त्याचबरोबर फळे व भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त पदार्थ उत्पादन करून त्यांची निर्यात वाढवून परकीय चलन मिळविण्यासाठी वाव आहे. त्यामुळे शेतमाल प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल व त्यापासून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू पाटील म्हणाले, प्रशिक्षणाचा लाभ घेऊन प्रशिक्षणार्थींनी कृषी उद्योजक होऊन, प्रक्रिया व विपणन या क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज आहे. कार्यक्रमास आर. टी. पाटील, नचिकेत कोटवालीवाले, दिलीप पवार, डॉ. सुनील गोरंटीवार आदी उपस्थित होते. या प्रशिक्षणाला संपूर्ण भारतातून ११४ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.