कलावंतांचा इष्टांक व मानधनाच्या रकमेत दुपटीने वाढ करावी; जिल्हा परिषदेत निवेदन
By चंद्रकांत शेळके | Published: August 25, 2023 06:58 PM2023-08-25T18:58:03+5:302023-08-25T19:10:27+5:30
वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन निवड समितीचा ठराव
अहमदनगर : वृध्द, साहित्यिक व कलाकार मानधन योजनेच्या इष्टांकात व कलावंतांच्या मानधनात दुपटीने वाढ करावी, असा ठराव वृध्द साहित्यिक व कलाकार मानधन समितीच्या बैठकीत करण्यात आला.
शुक्रवारी (दि. २५) जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, वृध्द साहित्यिक व कलाकार मानधन निवड समितीचे अध्यक्ष ह.भ.प. नानासाहेब गागरे, सदस्या लावणी सम्राज्ञी राजश्री नगरकर, सदस्य शाहीर निजामभाई शेख, शाहीर विजय तनपुरे व ह.भ.प. महादेव महाराज झेंडे उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे. जिल्ह्यात तमाशा, लावणी, शाहिरी, कलगीतुरा, वासुदेव, पिंगळा, गोंधळ, जागरण, नंदीवाले, बहुरूपी, रायरंद, तंतू वाद्य वादक, चर्म वाद्य वादक, नाटक, संगीत, गायन, भारुड, गवळण अशा अनेक लोककला व लोक कलावंत आहेत. त्याचबरोबर अकोले, संगमनेर तालुक्यांमध्ये आदिवासींचे कांबड नृत्य, फुगडी नृत्य, गौरी नृत्य, होळी नृत्य, बोहाडा नृत्य अशा कला प्रकारांचा व कलावंतांचाही विचार व्हावा. सध्या दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातील फक्त १०० कलावंतांनाच या योजनेचा लाभ देण्यात येतो. यात अनेकजण वंचित राहतात. त्यामुळे हा इष्टांक १०० वरून २०० करावा, तसेच सध्या अ, ब, व क वर्गातील कलावंतांना मिळत असलेल्या मानधनाच्या रकमेत दुपटीने वाढ करावी, अशी मागणी करणारा ठराव संमत करण्यात आला. या मागणीचे निवेदन जिल्हा निवड समिती, जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सांस्कृतिक मंत्री यांना पाठविणार असल्याचे समितीचे अध्यक्ष नानासाहेब गागरे यांनी सांगितले.
अशी होणार प्रस्तावांची पडताळणी
या बैठकीत तालुकानिहाय कलावंतांच्या प्रस्तावाची पडताळणी करण्याची जबाबदारी तालुकानिहाय देण्यात आली. शेवगाव, पाथर्डी व नेवासा - नानासाहेब गागरे, राहुरी, श्रीरामपूर - शाहीर विजय तनपुरे, श्रीगोंदा, कर्जत - ह.भ.प. महादेव महाराज झेंडे, पारनेर व जामखेड - निजामभाई शेख, नगर शहर व तालुका - लावणी सम्राज्ञी राजश्री काळे, अकोला, कोपरगाव - विजय गायकवाड, राहाता, संगमनेर - नवनाथ महाराज म्हस्के हे पडताळणी करणार आहेत.