नगरच्या उद्योगांवर मंदीचे संकट
By Admin | Published: June 2, 2014 12:20 AM2014-06-02T00:20:37+5:302014-06-02T00:36:33+5:30
अण्णा नवथर, अहमदनगर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांवर मंदीचे संकट कोसळले आहे़ उत्पादीत मालाच्या मागणीत घट झाली
अण्णा नवथर, अहमदनगर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांवर मंदीचे संकट कोसळले आहे़ उत्पादीत मालाच्या मागणीत घट झाली असून, कारखान्यातील उत्पादन काही वेळासाठी बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे़ लाखो कामगारांच्या हाताला काम देणार्या उद्योग क्षेत्राकडे लक्ष देण्यास कुणालाही फुरसत नाही़ त्यामुळे नगरचे उद्योग बेकारी निर्माण करणारे कारखाने होणार की काय,अशी भिती निर्माण होत आहे़ अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मालाला फारसा उठाव नाही़ त्याचा फटका बड्या कंपन्यांना बसला़ चैनीच्या वस्तूंना उठाव नाही़ मागणी घटल्याने निर्मितीला मर्यादा आल्या आहेत़ त्याचा निर्यातदारांवर परिणाम झाला़ त्यास नगरचे निर्यातदारही अपवाद नाहीत़ त्यांच्या मालाची मागणी घटली आहे़ विदेशातून येणार्या आर्डस कमी झाल्या़ अनंत अडचणीतून मार्ग काढत विदेशी निर्यातदारांच्या पंगतीत येथील उद्योजक विराजमान झाले़ पण अंतरराष्ट्रीय मंदीने हे उद्योगही अडचणीत सापडले आहेत़ स्थानिक मोठ्या उद्योगांना सुटे भाग पुरविणार्या कंपन्यांची यापेक्षाही भयावह स्थिती आहे़ कारण आधीच उत्पादन क्षमता कमी, त्यात मालाला उठाव नाही़ त्यामुळे छोट्या कंपन्यांना उतरती कळा लागली असून, कामगार कपातीची त्यांच्यावर वेळ आली आहे़ नगर शहरात बोटावर मोजण्या इतकेच मोठे उद्योग आहेत़ त्यात लार्सन अॅण्ड टुब्रो, इंटेन, क्रॉम्प्टन, सिमलेसचा समावेश आहे़ या कंपन्यांना लागणारे सुटे भाग ते छोट्या कंपन्याकडून घेतात़ तशी आॅर्डर त्यांच्याकडून छोट्या कंपन्यांना दिली जाते़ आर्डरनुसार छोट्या कंपन्या उत्पादन करतात़ त्यापेक्षा अधिक उत्पादन करण्याचे धाडस कोणी करत नाही़ जेवढी मागणी तेवढाच माल तयार करायचा आणि आलेल्या पैशातून खर्च भागवायचा, या ठोक ताळ्यानुसार उद्योगांची वाटचाल सुरू आहे़ मोठ्या उद्योगांच्या गळ्याशी आल्याने कमी-कमी दरात त्यांनाही माल हवा आहे़ मोठ्या कंपन्यांनी कमी दराने माल देणार्या कंपन्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे़ परिणामी पुरवठादार कंपन्यांत जीवघेणी स्पर्धा सुरू झाली़ या स्पर्धेत काही उद्योजक तग धरू शकत नाहीत़ त्यामुळे त्यांनी रिव्हर्स गियर ओढाला असून, मोठे उद्योग न आल्यास बहुतांश उद्योगांचे बॉयल थंडावतील आणि कामगारांवर घरी बसण्याची वेळ येणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे़ सुटे भाग बनविणार्या कंपन्या नागापूर औद्योगिक वसाहतीत मोठ्या कंपन्यांना पुरवठा करणार्या सुमारे ७०० छोट्या कंपन्या आहेत़या कंपन्या मोठ्या कंपन्यांना लागणार्या साहित्याचा पुरवठा करतात़ त्यामुळे या कंपन्यांचे भवितव्य मोठ्या कंपन्यांवर अवलंबून असते़ ही संख्या नागापूर औद्योगिक वसाहतीत सर्वाधिक आहे़पण तयार झालेले साहित्य घेणार्या कंपन्या नाहीत़ त्यामुळे छोट्या उद्योगाच्या उत्पादनाला मर्यादा आल्या आहेत़ एका शिफ्टमध्येच कंपनीचे काम सुरुवातीच्या काळात मोठ्या कंपन्या होत्या़ त्यामुळे छोट्या कंपन्यांना भरपूर काम मिळायचे़ मिळालेल्या आॅर्डर्स वेळेत देण्यासाठी रात्रंदिवस कंपनीचे काम सुरू असायचे़ परिणामी कामगारांना ओव्हरटाईम मिळत होता परंतु आता मागणीच नाही़ त्यामुळे एकाच शिफ्टमध्ये काम सुरू असून,त्यातही काहीवेळा काम बंद ठेवावे लागत आहे़त्यामुळे कामगारांना परवडत नाही़ परिणामी कामगार इतर शहरांत जातात़ निर्यातीत मोठी स्पर्धा स्थानिक बाजारात मागणी नाही़ त्यामुळे इतर राज्यांत पुरवठा करणे शक्य आहे़ परंतु त्या स्पर्धेत आपण टिकू शकत नाही़ कारण उत्पादन खर्च अधिक असून, कमी दरात माल देणे अशक्य आहे़तसेच गुणवत्ताही आपल्याकडे नसल्याने निर्यात करणेही अशक्य आहे़ विविध प्रकारचे कर आकारण्यात येतात़ ते इतर राज्यात नाहीत़ त्यामुळे परराज्यात व्यवसाय करताना कर आपल्याच खिशातून जातो़ परिणामी वाहतूक आणि कराचा बोजा उद्योजकांवर पडत असून,बाहेरचे दरवाजे आपल्यासाठी बंद होत आहे़ यामुळेही मंदी आहे़यातून बाहेर निघायचे असेल तर कर रद्द करणे गरजेचे आहे़ - संजय बंदिष्टी, उद्योजक मोठे उद्योग कमी आहेत़ त्यामुळे माल घेणार्यांपेक्षा देणार्यांची संख्या वाढली आहे़ त्यामुळे स्पर्धा होऊन मंदी आली आहे़इतर ठिकाणी माल पाठवायचा तर ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही़ कारण गुणवत्ता आणि वाहतूक, हे छोट्या उद्योजकांच्या आवाक्या बाहेरचे आहे़ मोठे उद्योग आणणे हा एकमेव पर्याय आहे़ - राजेंद्र शुक्रे, उद्योजक