अन् डॉ. बाबासाहेब श्रीगोंद्यात थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 01:35 PM2019-04-14T13:35:56+5:302019-04-14T13:36:15+5:30
भारतीय संविधानाच्या माध्यमातून तमाम भारतीयांना आपले हक्क व अधिकार मिळवून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३२ मध्ये कर्जतहून पुण्याकडे जात असताना त्यांच्या गाडीतील इंधन संपले. त्या
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : भारतीय संविधानाच्या माध्यमातून तमाम भारतीयांना आपले हक्क व अधिकार मिळवून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३२ मध्ये कर्जतहून पुण्याकडे जात असताना त्यांच्या गाडीतील इंधन संपले. त्यामुळे त्यांना काही काळ श्रीगोंद्यात थांबावे लागले होते. त्यांच्या पदस्पर्शाने जी जागा पावन झाली, त्या जागेवर उभारण्यात आलेले स्मारक आज डॉ. बाबासाहेबांच्या श्रीगोंदा भेटीच्या आठवणींना उजाळा देत आहे.
देशाच्या विविध भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक प्रबोधन व मानवमुक्तीचा लढा उभारला. त्यांच्या कार्याच्या अनेक आठवणी व प्रसंग आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरत आहेत.
अशीच एक आठवण श्रीगोंद्यातून बाबासाहेबांनी केलेल्या प्रवासाचीही आहे. १९३२ मध्ये तेव्हा १३ ते १४ वर्षे वय असलेल्या दिनकर घोडके या मुलाने बाबासाहेब आंबेडकरांना श्रीगोंद्यातील सिद्धार्थनगर येथे थांबल्याचे पाहिले. त्याकाळी अज्ञान व शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या समाजातील जाणकार व वयोवृध्द लोक बाबासाहेबांच्या चरणांवर लोटांगण घेताना पाहिल्याचे घोडके हे आपल्या कुटुंबातील लोकांना वारंवार सांगत. घोडके कुटुंबीयांच्या आठवणीनुसार साधारण १९३२ च्या आसपास कर्जत येथील आपली नियोजित सभा आटपून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारने पुण्याच्या दिशेने चालले होते.
श्रीगोंदा येथील सिद्धार्थनगर परिसराच्या आसपास जेथे भली मोठी वडांची झाडे होती. त्याच्या सावलीत बाबासाहेब गाडीचे इंधन संपले म्हणून थांबले होते. त्यावेळेस संबंध समाजात बाबासाहेब आल्याचे समजले. त्यामुळे त्यांना बघायला जमलेल्या समाजबांधवांना बाबासाहेबांनी, ‘मी काही देवमाणूस नाही. तुमच्यातीलच, तुमचा एक शिकलेला मुलगा आहे, माझ्या पायावर कशासाठी डोके ठेवता? पाया पडू नका. तुम्ही पुस्तके वाचा. मुलांना शाळा शिकवा. आपला परिसर स्वच्छ ठेवा’ असा संदेश दिला.
श्रीगोंद्यातील व्यक्तीने आपल्या ट्रॅक्टरमधील इंधन काढून बाबासाहेबांच्या गाडीत भरले अन् बाबासाहेब पुण्याच्या दिशेने निघून गेले. त्यावेळस येथे आसपास पेट्रोल पंप नव्हता. या ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार दिनकर घोडके यांचा त्यांच्या हयातीत अनेक सामाजिक संघटना व मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात आला आहे. दिनकर घोडके हे १८ एप्रिल २०१४ रोजी काळाच्या पडद्याआड गेले.
दीड कोटी रुपयांच्या स्मारकातून तरुणाईस प्रेरणा
ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर थांबले होते, त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी व महापुरूषाचे स्मरण म्हणून एक एकर जागेत दीड कोटी रूपयांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. याच जागेत जिल्हा परिषदेची शाळाही आहे. दिवंगत दिनकर घोडके व काही सामाजिक संघटनांच्या मागणीनुसार व आंदोलनानंतर श्रीगोंदा नगरपालिकेने या स्मारकाची निर्मिती केली आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्श झालेल्या या जागेत हे भव्य स्मारक उभे राहिले आहे. या स्मारकात युवकांसाठी व्यायामशाळा, वाचनालय, ध्यान धारणा, धम्म मार्गदर्शन, भिखू संघ यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच मंगल परिणय व व्याख्यान देण्यासाठी प्रशस्त हॉलची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देणारे हे स्मारक तरूणाईला दिशादर्शक ठरणार आहे.