डॉ. संदीप सांगळे एमपीएससीच्या आरोग्य उपसंचालक परीक्षेत राज्यात प्रथम
By चंद्रकांत शेळके | Published: August 24, 2023 02:14 PM2023-08-24T14:14:50+5:302023-08-24T14:14:58+5:30
डॉ. सांगळे हे नगर जिल्ह्यातील असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पारनेर तालुक्यात झाले.
अहमदनगर : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये नगर जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या डाॅ. संदीप सांगळे यांनी एमपीएससीच्या आरोग्य उपसंचालक परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ते सध्या पुण्यातील आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. मागील महिन्यातच त्यांची नगरहून पुण्याला बदली झाली.
डॉ. सांगळे हे नगर जिल्ह्यातील असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पारनेर तालुक्यात झाले. पुढे नगर शहरात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्याच्या बीजे मेडिकल काॅलेजमधून एमबीबीएसची पदवी मिळवली. यातही डॉ. सांगळे पुणे विद्यापीठात प्रथम होते. २०११ मध्ये त्यांची एमपीएससीमधून जिल्हा आरोग्य अधिकारीपदावर निवड झाली. डॉ. सांगळे यांनी बीड आणि अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. नगर जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांपासून ते कार्यरत होते.
कोरोनाच्या काळात नगरमध्ये त्यांनी प्रशासन आणि आरोग्य विभाग यातील दुवा म्हणून यशस्वी कामगिरी बजावली. डॉ. सांगळे यांनी यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये उल्लेखनीय काम केलेले आहे.
एमपीएससीकडून आयोजित उपसंचालक पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात राज्यातून १२ जणांची निवड झाली आहे. त्यात डाॅ. सांगळे हे पहिल्या क्रमांकावर आहेत. महिनाभरात त्यांना आरोग्य उपसंचालक पदावर नियुक्ती मिळणार आहे.