श्रीरामपूरकरांचे स्वप्नातील घर आवाक्यात
By Admin | Published: February 17, 2016 10:39 PM2016-02-17T22:39:35+5:302016-02-17T22:42:38+5:30
मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर अव्वाच्या सव्वा किमतीतील महागडी, परवडू न शकणाऱ्या श्रीरामपूरकरांना स्वप्नातील घर आता आवाक्यात आले आहे.
मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर
अव्वाच्या सव्वा किमतीतील महागडी, परवडू न शकणाऱ्या श्रीरामपूरकरांना स्वप्नातील घर आता आवाक्यात आले आहे. श्रीरामपूरच्या बोरावकेनगरमध्ये सध्या महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ अर्थात म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेचे काम सुरू असून अंतिम टप्प्यात पोहचले आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के कंपनीस या योजनेचे काम देण्यात आले आहे. ही कंपनी या योजनेतील सुमारे १ हजार घरांचे बांधकाम करीत आहे. पहिल्या टप्प्यात दोनशे ते अडीचशे सदनिका (फ्लॅटस्) बांधल्या जाणार आहेत. म्हाडाचे नाशिक येथील उपविभागीय अभियंता ए. के. जाधवर यांनी मंगळवारी श्रीरामपूरमधील या प्रकल्पास नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्यासमवेत भेट देऊन योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
श्रीरामपूरच्या काही भागात सध्या १५ ते २५ लाख रुपये गुंठ्याने जमीन विकल्या जात आहेत. नाशिक-पुण्यापेक्षाही जमिनींचे भाव आकाशाला नेऊन ठेवल्याने सर्वसामान्य आम आदमीचे स्वप्नातील घराचे स्वप्न सध्याचे महागडे दर परवडत नसल्याने व त्याचा आर्थिक भार पेलवत नसल्याने अपूर्ण राहत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात श्रीरामपूरमध्ये फ्लॅट संस्कृती वाढीस लागली आहे. महागडे फ्लॅट घेऊ न शकलेला मोठा वर्ग अजूनही हक्काच्या घरापासून दूर आहे. अशा गरीब व मध्यम वर्गासाठी म्हाडामार्फत घरे बांधली जात आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार अल्प उत्पन्न गटासाठी ४२० स्क्वेअर फूट बिल्ट अप एरियाच्या वन बी. एच.के.च्या म्हाडाच्या फ्लॅटची किंमत १० लाख ८० हजार रूपये तर मध्यम उत्पन्न गटाच्या वन बी. एच. के. च्या ७०० स्क्वेअर फूट बिल्ट अप एरियाच्या फ्लॅटची किंमत सुमारे १९ ते २० लाख रुपयांच्या जवळपास निश्चित केली जात आहे. सध्या उपलब्ध असलेल्या खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या योजनांमधील २० लाखांपुढील फ्लॅटस् न परवडणाऱ्यांना म्हाडामुळे स्वप्नातील घर आवाक्यात आले आहे.