पाथर्डी-नगर बसच्या चालक, वाहकास मारहाण करून लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:47 PM2018-06-25T12:47:22+5:302018-06-25T12:47:34+5:30
पाथर्डी : पाथर्डी आगाराच्या नगरहून पांढरीपूलमार्गे पाथर्डीकडे येणाऱ्या बस चालकास जोहारवाडी शिवारात मारहाण करून वाहकाच्या खिशातील तिकिटाची रक्कम ६ ...
पाथर्डी : पाथर्डी आगाराच्या नगरहून पांढरीपूलमार्गे पाथर्डीकडे येणाऱ्या बस चालकास जोहारवाडी शिवारात मारहाण करून वाहकाच्या खिशातील तिकिटाची रक्कम ६ हजार ८४६ रुपये बळजबरीने काढून नेल्याची घटना घडली. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी दुपारी तीन वाजता पाथर्डी आगाराची बस एम. एच. १४, बी. टी. ११५९ ही मांडवामार्गे नगरला जात असताना साडेचार वाजण्याच्या सुमारास जोहारवाडी येथे रस्त्यातील खड्यात टँकर गेला असल्याने रस्त्यावर लोक जमा झाले होते. त्यामुळे बस थांबली. रस्ता मोकळा झाल्यानंतर बस पुढे जावू लागली असता बसला तीन ते चार चार इसमांनी आडवे येवून चालकास शिवीगाळ केली. परंतु बस चालक पालवे यांनी बस समजूतदारीने पुढे नेली. दुस-या दिवशी रविवारी सकाळी साडे दहा वाजता बसचालक पालवे व वाहक आशा सुभाष बुळे हे पांढरीपूलमार्गे परत पाथर्डीला येत असताना जोहारवाडी शिवारात कौडगाव आठरे येथील आरोपी लक्ष्मण आश्रुजी आठरे, राजेंद्र जग्गनाथ आठरे व इतर दहा ते पंधरा लोकांनी बसला पिकअप (एम. एच. १६, सी. सी. ४२१) आडवी लावून बसचालक रोहिदास ज्ञानदेव पालवे यांना बसचे खाली ओढून कु-हाड, काठ्या, चैन व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच वाहक आशा बुळे यांच्याकडील तिकिटाचे जमा झालेले ६ हजार ८४६ रुपये बळजबरीने हिसकावले. बसचालक पालवे यांना झालेल्या मारहाणीत डोक्याला, पाठीला, हात व पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात वाहक आशा बुळे यांनी सरकारी कामात अडथला आणून सरकारी कर्मचा-यास मारहाण करून बळजबरीने रक्कम चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.