लॉकडाऊनमध्ये देशाला अन्नधान्य पुरविणारे वाहनचालक स्वतः उपाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:23 AM2021-05-25T04:23:02+5:302021-05-25T04:23:02+5:30
श्रीरामपूर : कोरोना काळात संपूर्ण देशाला अन्नधान्य, औषधे व जीवनावश्यक इतर वस्तूंचा सुरळीत पुरवठा करणारे वाहन चालक स्वतः मात्र ...
श्रीरामपूर : कोरोना काळात संपूर्ण देशाला अन्नधान्य, औषधे व जीवनावश्यक इतर वस्तूंचा सुरळीत पुरवठा करणारे वाहन चालक स्वतः मात्र उपासमारीचा सामना करत आहेत. मोठमोठ्या शहरांमध्ये व महामार्गावर हॉटेल बंद, किराणा व भाजीपाला नाही. त्यामुळे वाहन चालकांवर उपाशी झोपण्याची वेळ आली आहे.
सरकारने लॉकडाऊन काळात मालवाहतूक व उद्योगधंद्यांना सूट दिली आहे. मात्र, त्यामुळे मालवाहतूकदारांना कोणताही लाभ झालेला दिसत नाही. डिझेल दरवाढीमुळे आधीच कंबरडे मोडले असताना या संकट काळात टोलवसुली थांबलेली नाही. लसीकरण मोहिमेतही वाहनचालकांचा समावेश करण्यात आला नाही, विमा संरक्षणाचे कोणतेही सुरक्षाकवच नाही, अशा स्थितीत अत्यावश्यक सेवा करून वाहन चालक देशाची निस्वार्थ सेवा बजावत आहेत, अशी भावना चालक व्यक्त करत आहेत.
----
उत्पन्न घटले, कर्जाचे हप्ते सुरूच
लॉकडाऊन काळात भाडे कमी झाले आहे. त्यातच वाहन कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे वाहन उद्योग पूर्णपणे कोलमडून पडेल, अशी भीती व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
------
ज्याचा माल त्याचा हमाल कागदावरच
मागील राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्याचा माल त्याचा हमाल असा आदेश पारित केला होता. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे दोन्ही बाजूने हमालीचा खर्च व्यापाऱ्यांऐवजी वाहनचालकांना सोसावा लागत आहे.
------
उत्तर जिल्ह्यात दीड हजार वाहने
उत्तर नगर जिल्ह्यात सुमारे दीड हजार वाहन चालक आहेत. यामध्ये सहा टायरपासून चौदा टायरपर्यंतच्या वाहनांचा समावेश आहे.
------
ऑनलाईन पेमेंट पद्धतीचा आम्हाला कोणताही लाभ झालेला नाही. मालाची पोहोच दिल्यानंतर व्यापारी दीड महिन्यानंतर पैसे पाठवतात. मात्र, तोपर्यंत डिझेल, टोल तसेच जेवणासाठी घरातून खर्च होतो व बँकांना दिलेले चेक बाऊन्स होतात.
आयुब फकीरचंद कच्छी,
अध्यक्ष, उत्तर नगर जिल्हा ट्रान्सपोर्ट
------
अत्यावश्यक सेवेतील दूध, रुग्णवाहिका ही वाहने दुरुस्त करून द्यायची असली तरी हार्डवेअर व बॅटरीची दुकाने बंद आहेत. त्यामुळे वस्तू मिळत नाहीत. गॅरेज व्यावसायिक त्यामुळे त्रस्त झाले आहेत.
बब्बूभाई फिटर, श्रीरामपूर.
----