नगरच्या जवानाच्या सतर्कतेमुळे टळला जम्मूच्या लष्करी तळावरील ड्रोन हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:14 AM2021-06-30T04:14:23+5:302021-06-30T04:14:23+5:30
सारोळा कासारच्या सुभेदार शंकर खोसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाची धाडसी कारवाई योगेश गुंड अहमदनगर: जम्मूत हवाई दलाच्या तळावर रविवारी करण्यात ...
सारोळा कासारच्या सुभेदार शंकर खोसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाची धाडसी कारवाई
योगेश गुंड
अहमदनगर: जम्मूत हवाई दलाच्या तळावर रविवारी करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर सोमवारी (दि.२८) पहाटे पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून ड्रोनद्वारे सैन्य तळांना निशाणा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जम्मूमध्ये सैन्य तळावरील ड्रोनद्वारे हल्ल्याचा दहशतवाद्यांचा हा प्रयत्न नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील रहिवासी असलेले सुभेदार शंकर विजय खोसे यांच्या सतर्कतेमुळे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पथकाच्या धाडसी कारवाईमुळे उधळला गेला.
जम्मू हवाई दलाच्या तळावर शनिवारी रात्री दोन स्फोट करण्यात आले होते. ज्या छतावर पहिला स्फोट झाले तिथे बरेचसे नुकसानही झाले. मात्र, दुसरा स्फोट एका मोकळ्या जागी झाला. पहिल्यांदाच दहशतवाद्यांकडून ड्रोनद्वारे सैन्य तळांना निशाण्यावर घेण्यात आल्याने सैन्यदल सतर्क झाले. जम्मू मध्ये सर्वत्र सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली. या हवाई तळापासून ६ किमी अंतरावर रत्नुचक कालूचक येथे भारतीय सैन्यदलाचे ब्रिगेड मुख्यालय आहे. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविताना त्याची जबाबदारी ६८ आर्मड रेजिमेंटचे सुभेदार शंकर खोसे यांच्यावर सोपविण्यात आली होती.
------------------------
तुफान गोळीबार करत उधळला दहशतवाद्यांचा कट
सैन्य तळावर युनिट कंट्रोलर म्हणून कर्तव्य बजावत असताना सुभेदार खोसे यांना रविवारी (दि.२७) रात्री ११.४५ च्या सुमारास ड्रोनचा आवाज आला. त्यांनी सतर्कता दाखवत आपल्या पथकाला सावध केले आणि रात्रीच्या अंधारात गस्त सुरु केली. त्यांची गस्त सुरू असताना पुन्हा पहाटे २.४० च्या सुमारास त्यांना २ ड्रोन लष्करी तळावर घिरट्या घालताना आढळून आले. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली आणि त्यांच्याकडून आदेश प्राप्त होताच त्यांनी व त्यांच्या पथकाने ड्रोनच्या दिशेने तुफान गोळीबार सुरु केला. त्यानंतर घिरट्या घालणारे ड्रोन काही वेळातच अंधारात नाहीसे झाले.
-------------------
अंगावर थरकाप उडवणारा प्रसंग
रात्रीच्या गडद अंधारात आणि घनदाट जंगल परिसर असलेल्या या भागात केलेल्या कारवाईचा हा प्रसंग अतिशय थरारक होता असे सुभेदार शंकर खोसे यांनी सांगितले. मात्र तरीही मी आणि माझ्या साथीदारांनी दहशतवाद्यांचा हा कट उधळून लावण्यात यशस्वी झालो याचे मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. या लष्करी तळावर २००२ मध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता.
---------------------
कुस्ती कोच ते धाडसी योद्धा
सुभेदार शंकर खोसे यांचे मूळ गाव हे अस्तगाव (ता.पारनेर) असून त्यांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य सध्या सारोळा कासार येथे आहे. खोसे हे १९९२ मध्ये लष्करात भरती झाले. भरती होण्यापूर्वी नामवंत कुस्तीपटू म्हणून त्यांची ओळख होती. लष्करात गेल्यावरही त्यांनी अनेक कुस्ती स्पर्धा गाजविल्या. सध्या ते लष्कराचे कुस्ती कोच म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून काम पाहत आहेत. कुस्ती कोच ते धाडसी योद्धा असा त्यांचा प्रवास आहे. त्यांचे धाकटे बंधू विष्णू खोसे हे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व युवा महाराष्ट्र केसरी आहेत. सुभेदार खोसे यांच्या पराक्रमाची वार्ता सारोळा व अस्तगावमध्ये समजताच दोन्हीही गावच्या ग्रामस्थांचा उर अभिमानाने भरुन आला. दोन महिन्यानंतर ते लष्कराच्या २९ वर्षांच्या दीर्घ सेवेतून निवृत्त होणार आहेत.
फोटो २९ शंकर खोसे