अवैध वाळू वाहतुकीला चाप बसविण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार - राधाकृष्ण विखे पाटील
By शेखर पानसरे | Published: May 29, 2023 07:38 PM2023-05-29T19:38:57+5:302023-05-29T19:39:12+5:30
श्रीरामपूर तालुक्यात ड्रोनचा वापर करून चार हजार ब्रास इतका अवैध वाळू साठा जप्त केला.
संगमनेर : श्रीरामपूर तालुक्यात ड्रोनचा वापर करून चार हजार ब्रास इतका अवैध वाळू साठा जप्त केला. अवैध वाळू वाहतुकीला चाप बसविण्यासाठी संगमनेरात सुद्धा ड्रोनचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे वाळू उपसा करणारे कोण आहेत, वाळू उपसा होत असलेली वाहने कोणाची आहेत. हे समजू शकेल. प्रशासनाला त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सांगितले असून त्यांना मोक्का लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. असे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
सोमवारी (दि. २९) महसूलमंत्री विखे पाटील संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संगमनेरात प्रवरा आणि म्हाळुंगी या दोन नद्यांच्या संगम होते. त्या संगमावर दशक्रियाविधी होतात. विधी सुरू असलेल्या ठिकाणापासून अगदी जवळूनच नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करत कालबाह्य झालेल्या रिक्षांमधून वाळू वाहतूक सुरू असते. त्यामुळे धार्मिक विधी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना वाळू चोरांचा त्रास होतो, अनेकदा पिंडाला सुद्धा कावळ्यांचा स्पर्श होत नाही. याबाबत त्यांना प्रश्न विचारला होता. वाळू माफियांची संगमनेर तालुक्याला लागलेली मोठी कीड होती. हळूहळू ती उध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. वाळू तस्करीचा आपण बिमोड करू. याची मला खात्री आहे. असेही विखे पाटील म्हणाले.