शेवगावात दुष्काळासाठी ठिय्या : राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 05:17 PM2018-08-06T17:17:20+5:302018-08-06T17:17:48+5:30
शेवगाव तालुका दुष्काळी जाहीर करून जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांना चालना देण्याच्या मागणीसाठी शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेवगाव तहसीलच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शेवगाव : शेवगाव तालुका दुष्काळी जाहीर करून जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांना चालना देण्याच्या मागणीसाठी शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेवगाव तहसीलच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शेवगाव तालुक्यात पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. अत्यल्प पावसावर शेतक-यांनी घेतलेल्या कपाशीवर यंदा बोंड येण्यापूर्वीच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पेरणी केलेली कपाशी जळून व करपून चालली आहे. गेल्यावर्षीच्या बोंडअळीच्या अनुदानापासून अनेक गावे वंचित आहेत. अनेक गावात पिण्याचे पाणी, पाटपाणी, वीज, रस्ता आदी मूलभूत समस्या तीव्र बनल्या आहेत. त्यामुळे शेवगाव तालुका दुष्काळी जाहीर करून जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांना चालना मिळावी. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास प्रसंगी तहसील कार्यालयाचे कामकाज बंद पाडण्यात येईल, असा इशारा सभापती डॉ. घुले यांनी यावेळी दिला.
प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व उपस्थित शेतकºयांनी प्रभारी तहसीलदार भानुदास गुंजाळ यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच शेतक-यांच्या समस्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. अपु-या पावसावर शेतक-यांनी कपाशी बाजरी तूर, मूग, उडीद पिकांची पेरणी केली. मात्र पावसाअभावी ही पिके करपून व जळून चालली आहेत. प्रशासनाने खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची तसेच बोंडअळीच्या नुकसान भरपाईची रक्कम तातडीने वाटप करावी, तालुक्याच्या पूर्व भागातील राक्षी, मुरमी,बाडगव्हाण, गोळेगाव, नागलवाडी आदी अनेक गावात पाणी टंचाई उग्र बनल्याने या गावांमध्ये तातडीने टमकर सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी बाजार समितीचे सभापती संजय कोळगे, रामनाथ राजपुरे, तालुकाध्यक्ष कैलास नेमाने,ताहेर पटेल, कृष्णा ढोरकुले, संतोष जाधव,जि.प.सदस्य राम साळवे, विजय पोटफोडे,विकास फलके, शिवाजी घुले, माधव काटे, वहाब शेख, कृष्णा पायघन, बबनराव भुसारी आदींनी प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास रास्तारोको करण्याचा इशारा यावेळी दिला. प्रभारी तहसीलदार भानुदास गुंजाळ यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
शेवगाव पाथर्डी तालुक्यातील मुळा पाटपाणी कार्यक्षेत्रात टेल टू हेड पद्धतीने आवर्तन सोडून संपूर्ण क्षेत्र भिजल्याशिवाय पाटपाण्याचे आवर्तन बंद करू नये. मागील आवर्तनाचे पाणी कमांड क्षेत्रात मिळाले नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये नाराजीची भावना आहे. परिसराला वरदान ठरणारे आमच्या हक्काचे पाणी मिळावे, याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्र्रशेखर घुले यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांशीकडे भ्रमणध्वनीद्वारे केली. याबाबत दुजाभाव दिसून आल्यास लाभार्थी शेतक-यांचे आंदोलन उभारण्यात येईल. -डॉ.क्षितिजघुले, सभापती, पंचायतसमिती, शेवगाव.