दुष्काळाचे ढग : २३ दिवस खेटा मारूनही मिळेना टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 04:08 PM2018-10-09T16:08:34+5:302018-10-09T16:11:14+5:30
नगर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने आतापासुनच काही गावांमध्ये पाण्याची टंचाई वाढु लागली आहे. उक्कडगावमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष वाढल्याने टँकरमंजुरीसाठी प्रस्ताव दिला.
योगेश गुंड
केडगाव : नगर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने आतापासुनच काही गावांमध्ये पाण्याची टंचाई वाढु लागली आहे. उक्कडगावमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष वाढल्याने टँकरमंजुरीसाठी प्रस्ताव दिला. प्रस्ताव मंजुर झाला. पण सतत २३ दिवस खेटा मारूनही उत्तर मिळाले ‘टँकरच शिल्लक नाही’ टँकरसाठी इतक्या चकरा मारूनही पदरी निराशा पडल्याने येणारा काळ पाण्यावीना किती भयान असणार या चिंतेत आता ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणूस पडला आहे.
नगर तालुक्यात पावसाने ५ टक्के सरासरीचा ही टप्पा गाठला नाही. परतीच्या पावसाकडे डोळे लाऊनही पदरी काहीच पडले नाही. काही गावांमध्ये विहीरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासु लागली आहे. सध्या नगर तालुक्यात दोन गावात टँकर सुरु आहेत. उक्कडगाव येथे ही गावातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन सरपंच नवनाथ म्हस्के यांनी गावाला टँकर मिळावा यासाठी प्रस्ताव तयार केला.
टँकर चालू करण्यासाठी सरपंच म्हस्के यांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्याकडे टँकरसाठी १५ सप्टेंबरला प्रस्ताव सादर केला. १७ सप्टेबर तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांच्याकडे मंजुरीसाठी दिला. २५ सप्टेबरला प्रांत विभाग टंचाई शाखा उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे हा प्रस्ताव दिला. या प्रस्तावाला २१ दिवसांनी ६ आक्टोबरला मंजुरी दिली. या बाबतचे पत्र टंचाई विभागाने पंचायत समितीला टँकर चालु करण्याबाबत दिले. हे पत्र त्यांना ८ आॅक्टोबरला मिळाले. मात्र पाणी पुरवठा विभागाचे राम नाटे यांनी टँॅकरच शिल्लक नसल्याचे सांगीतले. टँकर पुरविण्याचा ठेका श्री गणेश सहकारी मोटार वाहतुक संस्था मर्या शेवगाव यांच्याकडे आहे. टँकर मंजुरीसाठी २३ दिवस पंचायत समिती तहसील, प्रांत कार्यालयात चकरा मारल्या. प्रांत विभाग टंचाई शाखेमधून अरेरावी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली असे म्हस्के यांनी सांगीतले.
गावाची पाणी टंचाई लक्षात घेऊन टँकर मागणीचा प्रस्ताव दिला. त्यासाठी रोज सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागल्या. पण प्रशासनाकडे टँकरच शिल्लक नसल्याचे उत्तर मिळाले. आता गावाचा पाणीप्रश्न कसा सोडवायचा हा आमच्या पुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. - नवनाथ म्हस्के, सरपंच, उक्कडगाव
उक्कडगावचा प्रस्ताव तहसील कार्यालयास प्राप्त झाला. आम्ही त्यास मंजुरी दिली आहे. तो पुढील कार्यवाहीसाठी टंचाईशाखेकडे पाठवला आहे. मात्र टँकर देण्यात काय अडचण आली ते आम्हाला सांगता येणार नाही. - आपासाहेब शिंद, तहसिलदार, नगर तालुका