डॉ.सुजय विखे, आ. संग्राम जगतापांसह १५ उमेदवारांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 01:12 PM2019-04-16T13:12:55+5:302019-04-16T13:18:26+5:30
दैनंदिन निवडणूक खर्च सादर करताना तफावत आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अहमदनगर मतदारसंघातील १५ उमेदवारांना नोटिसा पाठवल्या आहेत.
अहमदनगर : दैनंदिन निवडणूक खर्च सादर करताना तफावत आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अहमदनगर मतदारसंघातील १५ उमेदवारांना नोटिसा पाठवल्या आहेत. नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांत या उमेदवारांना खुलासा करावा लागणार आहे.
भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी १ एप्रिल ते १० एप्रिलदरम्यान घोषित केलेला खर्च १४ लाख ५६ हजार ८३० होता, तर प्रत्यक्षात निवडणूक आयोगाने परिगणित केलेला खर्च १८ लाख ५४ हजार ३५७ आहे. म्हणजे ३ लाख ९७ हजार ५२७ रूपयांचा खर्च त्यांनी कमी दाखवला. याशिवाय राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी घोषित केलेला खर्च ५ लाख ४२ हजार ५१२ एवढा असून निवडणूक आयोगाने परिगणित केलेला खर्च २० लाख ९५ हजार १०६ रूपये आहे. म्हणजे यात १५ लाख ५२ हजार ५५४ रूपये रकमेची तफावत आहे. या रकमेच्या फरकाबाबतचा तपशीलवार खुलासा करण्याच्या नोटिसा उमेदवारांना काढण्यात आल्या आहेत. इतर उमेदवारांच्या खर्चातही तफावत आहे.