कोर्टात मद्यपीने घातला धुडगूस, केला आत्महत्येचा प्रयत्न; कामकाज ठप्प, अहमदनगरमधील घटना
By शिवाजी पवार | Updated: July 3, 2024 18:59 IST2024-07-03T18:57:27+5:302024-07-03T18:59:00+5:30
दारू पिऊन शिवीगाळ, पाऊण तास रंगले नाट्य

कोर्टात मद्यपीने घातला धुडगूस, केला आत्महत्येचा प्रयत्न; कामकाज ठप्प, अहमदनगरमधील घटना
शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर): येथील न्यायालयामध्ये एका पक्षकाराने दारू पिऊन शिवीगाळ करत आत्महत्येचा प्रयत्न केला. अर्धा ते पाऊण तास त्याने धुडगूस घातल्याने न्यायालयाचे कामकाज ठप्प झाले. अखेर एका वकिलीने अन्य पक्षकाराच्या मदतीने पहिल्या मजल्यावरून त्याला खाली आणले.
बुधवारी दुपारी साडे तीन वाजता हे नाट्य घडले. पोलिसांनी बाळू सांडू गिरी (रा. वसमत, जि.हिंगोली) याला ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात आणले. त्याला समज देऊन सोडून देण्यात आले. एका खटल्यातील तो पक्षकार होता. तो न्यायालयात दारू पिऊनच दाखल झाला. सुरवातीला तो सत्र न्यायालयाच्या जवळ उभा राहिला. तेथे ते शिवीगाळ करत होता. मात्र यानंतर तो न्यायालयाच्या इमारतीवर पहिल्या मजल्यावरील एका धोकादायक कठड्यावर चढला. तेथे तो मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागला. आपल्याला जगण्याची इच्छा नाही. आत्महत्या करायची आहे, असे तो म्हणाला. त्यामुळे न्यायालयातील वकिल, पोलिस कर्मचारी व कामकाजासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी तेथे जमली. यावेळी न्यायालयाचे कामकाजही काही वेळ ठप्प झाले.
लोकांनी प्रयत्न समजून काढत त्याला खाली येण्याची विनंती केली. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर वकिल सलमान पठाण व एक पक्षकार या दोघांनीही त्या कठड्यावर चढून बाळू गिरी याला खाली आणले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.