दुर्देव : पत्नीचा बाळासह मृत्यू , पतीचाही अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 05:56 PM2018-08-26T17:56:08+5:302018-08-26T17:56:39+5:30
एक वषापुर्वीच विवाह झालेला. प्रसुती जवळ आल्याने पत्नीला दवाखान्यात दाखल केले. याचदरम्यान अगोदरच एका पायाने अपंग असलेल्या पतीचा अपघात झाला.
मिरी : एक वषापुर्वीच विवाह झालेला. प्रसुती जवळ आल्याने पत्नीला दवाखान्यात दाखल केले. याचदरम्यान अगोदरच एका पायाने अपंग असलेल्या पतीचा अपघात झाला. पतीलाही दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र पत्नीचा उपचारादरम्यान बाळासह दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने जामखेडमधील प्रदीप फलके यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला.
दहा महिन्यांपूर्वी रेणुकाईवाडी(ता.पाथर्डी) येथील कल्याण निंबाळकर यांची एकुलती एक मुलगी सोनाली हिचा विवाह जामखेड येथील प्रदीप फलके यांच्याशी झाला होता. प्रदीप यांचे आईवडील बिकट परिस्थितीमुळे कामानिमित्त परराज्यात स्थायिक झाले होते. नुकतीच सोनाली ही प्रसूतीसाठी माहेरी आली असता तिच्यावर मिरी(ता.पाथर्डी) येथील एका खाजगी रुग्णालयात प्रसूतीपूर्व उपचार सुरू होते. प्रसूतीपुर्वी तीन वेळा करण्यात आलेल्या तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या नव्हत्या. परंतु आठ दिवसांपूर्वी सोनालीला अचानक त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी सोनालीला अत्यवस्थ वाटू लागल्याने तिची प्रसूती होणे गरजेचे होते. परंतु नैसर्गिक प्रसूती होत नव्हती. सोनालीच्या जीवितास धोका असल्याचे लक्षात आल्याने डॉक्टरांनी तातडीने तिला नगर येथील एका रुग्णालयात हलविण्याचे सुचवले.
नातेवाइकांनी नाइलाजाने सोनालीला नगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले परंतु रुग्णाची परीस्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्यांनी पुन्हा पुण्याला हलविण्याचा सल्ला दिला. नातेवाइकांनी रूग्णाला रात्री अकराच्या सुमारास पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु रक्तदाब कमी असल्याने सोनालीची प्रसुती करणे अशक्य झाल्याने बाळाचा गुदमरून गर्भातच मृत्यू झाला तर सोनाली हिचेही शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. सोनालीचे पती अपघातग्रस्त असल्याने त्यांना वाहनाने ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतरच रुग्णालयाने मृतदेह ताब्यात दिला. त्यामुळे रात्री उशिरा सोनालीच्या मृतदेहावर तिच्या माहेरी अंत्यसंस्कार करण्यात आले.
पतीचेही अपघातात दोन्ही पाय झाले निकामी
प्रथमच एका पायाने अपंग असलेले सोनालीचे पती प्रदीप फलके यांचा आठ दिवसांपूर्वीच पावसाच्या पाण्यात घसरून झालेल्या अपघातात दुसरा पाय देखील निकामी झाला होता. अशातच सोनालीचे निधन झाल्याने दोन्ही कुटुंबावर दुखाचा डोंगर उभा राहिला आहे.
नगरच्या रुग्णालयाने एका दिवसाचे घेतले चाळीस हजार
नगरच्या खाजगी रुग्णालयात सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यत दाखल केलेल्या रुग्णाचे(सोनाली) बील कोणतीही शस्त्रक्रिया न करता सुमारे चाळीस हजार झाल्याने अशिक्षित व गरीब कुटुंबाची किती पिळवणूक केली जाते याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पूर्ण बील अदा करेपर्यंत सुमारे चार तास रूग्णाला ताटकळत ठेवल्याने नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली.