खराब हवामानामुळे शिर्डीतील पाच उड्डाणे रद्द, प्रवाशांचा मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 10:38 PM2019-07-01T22:38:27+5:302019-07-01T22:38:38+5:30
प्रवाशांची गैरसोय : विमान कंपनीकडून प्रवाशांची राहण्याची व्यवस्था
शिर्डी : शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पावसामुळे निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे भोपाळ, दिल्ली, बंगलोर आणि मुंबई आदी विमानांचे लँडींग न होताच ती परत गेली. संध्याकाळी दिल्ली येथून आलेल्या विमानाचे शिर्डीत लँडींग झाले, परंतु टेकऑफसाठी हवामान चांगले नसल्याने या विमानाचेही उड्डाण रद्द करण्यात आले.
१८० प्रवासी घेऊन परत दिल्लीच्या दिशेने टेकऑफ करण्याच्या तयारीत असताना उड्डाणासाठी व्हीजीबीलीटी मिळत नसल्याने दिल्लीला जाणाऱ्या या विमानाचेही टेकऑफ रद्द झाले असून या विमानातील प्रवाशांची विमान कंपन्यांनी शिर्डीत राहण्याची व्यवस्था केली आहे. मंगळवारी टेकऑफसाठी व्हीजीबीलीटी मिळताच दिल्लीचे विमान उडेल. दिल्ली, भोपाळ, बंगलोर आणि मुंबई येथे जाण्यासाठी चारशेच्यावर प्रवाशांनी आपली तिकिटे बुक केलेली होती. मात्र खराब हवामानाचा फटका बसल्याने ही विमाने शिर्डीत न उतरता परत गेली. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्टवर विमानांचे लँडींग व टेकऑफसाठी पाच किलोमीटर अंतराची व्हीजीबीलीटी आवश्यक असते. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ व पावसाच्या वातावरणामुळे तीन किलोमीटरच्या आतच व्हीजीबीलीटी मिळत असल्याने विमानांचे लँडींग व टेकऑफ रद्द करावे लागले. मंगळवारी व्हीजीबीलिटी मिळाली तर नियमित लँडींग व टेकऑफ करण्यात येईल.
- दीपक शास्त्री, डायरेक्टर, शिर्डी एअरपोर्ट