नगराध्यक्ष बदलामुळे जामखेड नगरपरिषदेतील भाजपची सत्ता गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 04:03 PM2020-06-17T16:03:42+5:302020-06-17T16:04:29+5:30

नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीन वर्षे भाजपशी जुळवून घेतले. अखेरच्या सहा महिन्यात नगराध्यक्ष बदलण्याची भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली. या बदलासाठी राष्ट्रवादीच्या एका नेत्याने बळ देण्याचा प्रयत्न केला. या नेत्याच्या कृत्यामुळे नगराध्यक्ष निखिल घायतडक व त्यांना मानणा-या दहा नगरसेवकांनी अचानक आमदार सुरेश धस व माजीमंत्री राम शिंदे यांना चकवा देऊन थेट आमदार रोहित पवार यांच्याबरोबर जुळवून घेऊन पद टिकवले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता आयती चालून आली.

Due to the change of mayor, the BJP lost power in Jamkhed Municipal Council | नगराध्यक्ष बदलामुळे जामखेड नगरपरिषदेतील भाजपची सत्ता गेली

नगराध्यक्ष बदलामुळे जामखेड नगरपरिषदेतील भाजपची सत्ता गेली

अशोक निमोणकर ।    

जामखेड :  नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीन वर्षे भाजपशी जुळवून घेतले. अखेरच्या सहा महिन्यात नगराध्यक्ष बदलण्याची भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली. या बदलासाठी राष्ट्रवादीच्या एका नेत्याने बळ देण्याचा प्रयत्न केला. या नेत्याच्या कृत्यामुळे नगराध्यक्ष निखिल घायतडक व त्यांना मानणा-या दहा नगरसेवकांनी अचानक आमदार सुरेश धस व माजीमंत्री राम शिंदे यांना चकवा देऊन थेट आमदार रोहित पवार यांच्याबरोबर जुळवून घेऊन पद टिकवले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता आयती चालून आली.

कोणत्याच पक्षाला  स्पष्ट बहुमत नसलेल्या जामखेड नगरपरिषदेमध्ये तीन वेळा राजकीय भूकंप झाले. पहिला भूकंप आमदार सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना झाला. त्यांनी राष्ट्रवादीचे दहा, शिवसेनेचे चार, मनसे एक व दोन अपक्ष गळाला लावून सतरा नगरसेवक एकत्र आणून एकतर्फी सत्ता मिळवली होती. त्यानंतर दीडच वर्षांनी सेनेचे दोन नगरसेवक वगळता सर्वच नगरसेवक तत्कालीन मंत्री राम शिंदे यांच्याकडे चालून आले. एकतर्फी सत्ता नगरपरिषदेची शिंदे यांच्याकडे आली. कट्टर समर्थक सोमनाथ राळेभात यांना नगराध्यक्ष केले.

 अडीच वर्षांनंतरचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी निघाले. या पदासाठी इच्छुक असलेले दोन नगरसेवक होते. सुरुवातीला नगराध्यक्षपदासाठी निखिल घायतडक यांना संधी देण्यात आली. घायतडक यांनी नगराध्यक्षपद चांगले सांभाळले. उपनगराध्यक्ष फरिदा पठाण यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मुस्लिम व बौध्द मतदार असलेल्या प्रभागात त्यांनी भाजपचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणून पक्षात व राम शिंदे यांच्याकडे आपले वजन वाढवले. घायतडक यांच्या कामगिरीवर पक्षात त्यांना वलय निर्माण झाले होते.

 विधानसभा निवडणूक लागताच पक्षातील काही नगरसेवकांनी नगराध्यक्ष बदलण्यासाठी प्रयत्न चालवले. यामागे एक राष्ट्रवादीचा नेता वेगळे फासे टाकत होता. तत्कालीन मंत्री राम शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर बदलाचे काय आहे ते पाहू असे सांगितले. त्यामुळे बदलाचा विषय बाजूला पडला. राम शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. फेब्रुवारी महिन्यात नगराध्यक्ष बदलाचा विषय पुन्हा चर्चेत आला. नगरसेवकांच्या एका गटाने विषय समित्याच्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत. त्यामुळे मार्च महिन्यात राम शिंदे यांनी नगराध्यक्ष निखिल घायतडक यांना राजीनामा देण्यास सांगितले. पण लॉकडाऊनमुळे राजीनामा लांबला.

 निखिल घायतडक यांचे पक्षात चांगले वजन असताना राम शिंदे यांनी त्यांना बदलण्याचा निर्णय घेतला तो घायतडक व इतर दहा नगरसेवकांना आवडला नाही. ते सुरेश धस यांच्याकडे गेले. त्यांनी यांना सहारा दिला. पण माजी मंत्री राम शिंदे यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून आ. धस यांना बाजूला केले. नगराध्यक्ष निखिल घायतडक यांचे पद टिकविण्याचे सर्व दरवाजे बंद झाल्यानंतर त्यांनी थेट आ. रोहित पवार यांच्याबरोबर जुळवून घेतले. दहा नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा करून नगराध्यक्ष बदलाची हवाच काढून घेतली.

आणखी सात नगरसेवक  राष्ट्रवादीच्या संपर्कात
आमदार पवार यांनी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचे स्वागत करून ताकद देण्याचे वचन दिले. राष्ट्रवादीची सत्ता नगरपरिषदेवर चालून आली. यानंतर आणखी सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी आजी, माजी आमदारांना चकवा देत थेट राष्ट्रवादीचे दार ठोठावून भाजपची सत्ता घालवली. कोणताही राजकीय वारसा नसताना घायतडक यांनी केलेली खेळी कसलेल्या राजकारण्यांना अंजन घालणारी ठरली आहे. 

Web Title: Due to the change of mayor, the BJP lost power in Jamkhed Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.