भंडारदरा परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 06:01 PM2018-12-26T18:01:42+5:302018-12-26T18:02:59+5:30

नववर्षाच्या स्वागताचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून ब्रिटिशकालीन भंडारदरा

Due to the crowd of tourists in the Bhandardara campus | भंडारदरा परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलला

भंडारदरा परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलला

हेमंत आवारी
अकोले : नववर्षाच्या स्वागताचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून ब्रिटिशकालीन भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील रिंगरोडवरील आदिवासी पाड्यांमध्ये जलाशयाभोवती पर्यटकांच्या निवासासाठी कापडी ‘तंबू’ सज्ज झाले आहेत. नाताळानिमित्त ‘भंडारदरा-रंधा-घाटघर-रतनगड-साम्रद’ परिसर पर्यटकांनी फुलला आहे. गतवर्षी यावेळी भंडारदरा धरण ९८ टक्के भरलेले होते. यंदा मात्र धरणात केवळ ४२ टक्के म्हणजे ४ हजार ७०५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून पर्यटकांचा ओघ बऱ्यापैकी आहे.
‘तंबू’ हे यावर्षीचे खास आकर्षण आहे. भंडारदरा धरणाची पाणी पातळी खोल गेली असून त्याचा परिणाम ‘बोटींग’ व्यवसायावर झाला आहे. तर जलसंपदा पाटबंधारे विभागाने धरण पात्रात टेंट (तंबू) लावू नये वा तेथे घाण कचरा होईल, असे कुणी व्यवसाय करू नये यासाठी तंबी दिली आहे. भंडारदरा जलाशयाभोवती ४५ किलोमीटरचा रिंगरोड असून या परिसरात धरणाच्या काठावर आपआपल्या सोयीनुसार आदिवासी युवकांनी पर्यटकांच्या निवासासाठी कापडी तंबू उभारले आहेत. भंडारदरा शेंडी येथील सर्व रिसोर्ट, हॉटेल व शासकीय विश्रामगृहे गर्दीने ओसंडतात. मुंबई-नाशिक भागातील पर्यटक तुलनेने जास्त येतात. एक दिवसाच्या कौटुंबिक सहलीपण मोठ्या प्रमाणात येथे हजेरी लावताना दिसतात व नौकाविहाराचा आनंद घेतात. २९ व ३० डिसेंबरला शनिवार, रविवार असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
धरणाच्या कडेला तंबू लावून व्यवसाय करणारांना घाण न करण्याची तंबी दिली आहे. गतवर्षी धरण काठोकाठ भरलेले होते. यंदा ४२ टक्के पाणी आज मितीस आहे. पाणी कमी असले तरी पर्यटकांचा ओघ कमी झालेला नाही. -किरण देशमुख, कार्यकारी अभियंता


भंडारदरा धरणाची पाणी पातळी खोल गेल्याने यंदा नाताळाची गर्दी थोडी कमी दिसते. मात्र शनिवारी, रविवारी गर्दी वाढेल. पर्यटक तंबूला पसंती देतात. व्यावसायिक, पर्यटकांनी पर्यावरणास हानी पोहचवू नये अन्यथा कारवाई केली जाईल. -डी. डी. पडवळ,
वनपरिक्षेत्र अधिकारी, भंडारदरा


आॅनलाईन बुकिंगपण असते. सेवा देता येईल इतकेच तंबू लावतो. शक्यतो कुटुंबवत्सल पर्यटकांना प्राधान्य देतो. आर्थिक कुवत पाहून पैसे घेतो. शौचालयाच्या वापरासाठी पर्यटकांना सक्ती आहे़ बोटींग वाकी धरणावर असते. नाईट सफारी असते. -रघुनाथ बो-हाडे,
वाकी, बेस कॅम्प


तंबूमुळे पर्यटकांची संख्या वाढलीय़ मात्र रिसोर्ट-हॉटेल व्यवसायावर त्याचा परिणाम झाला नाही.पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी सर्वच व्यावसायिक घेतात. पर्यटकांनीही स्वत:ची काळजी घ्यावी. बेधुंद होऊन निसर्गाला कवेत घेण्याचा प्रयत्न करू नये.
-अमित भांगरे, हॉटेल व्यावसायिक


पर्यटकांसाठी स्थानिक युवकांनी वन्यजीव व आदिवासी विभागाच्या मदतीने कापडी तंबूंमध्ये तात्पुरती निवास व्यवस्था केली आहे. मुरशेत, पांजरे-उडदावणे, घाटघर, साम्रद, रतनवाडी, मुतखेल येथील शेकडो आदिवासी तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सुमारे प्रति व्यक्ती बाराशे रूपयांपर्यंत एक दिवसाचा खर्च पर्यटकांकडून घेतला जातो. चहा, नाष्टा, दोन वेळचे जेवण, शेकोटी, बोट फेरी अशा सुविधा दिल्या जातात.

 

Web Title: Due to the crowd of tourists in the Bhandardara campus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.