गर्दीमुळे शिर्डीतील टाईम दर्शन व्यवस्था बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:04 AM2017-11-27T11:04:57+5:302017-11-27T11:09:52+5:30
टाईम दर्शनामुळे होणारे भाविकांचे हाल पाहून काही संतप्त ग्रामस्थांनी टाईम दर्शन व्यवस्था बंद केली. गर्दीमुळे कोलमडलेली व्यवस्था व ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून प्रशासनाने सहमती दर्शवत व्यवस्था काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
शिर्डी : टाईम दर्शनामुळे होणारे भाविकांचे हाल पाहून काही संतप्त ग्रामस्थांनी टाईम दर्शन व्यवस्था बंद केली. गर्दीमुळे कोलमडलेली व्यवस्था व ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून प्रशासनाने सहमती दर्शवत व्यवस्था काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
रविवारी गर्दीमुळे दर्शन रांगेत लागण्यापूर्वी टाईम दर्शनच्या पासेससाठी भाविकांना मोठमोठ्या रांगांचा सामना करावा लागला. श्रीराम पार्किंग व साईउद्यानमधील केंद्रावर गर्दी उसळली. यात वृद्ध, महिला, लहान मुले, अपंगांचे हाल झाले. याबाबत माहिती मिळताच नगरसेवक अभय शेळके, अशोक गोंदकर, प्रमोद गोंदकर, सुधाकर शिंदे आदींनी टाईम दर्शन पासेसच्या केंद्रावर धाव घेतली. भाविकांचे होणारे हाल पाहून त्यांनी गर्दी कमी होईपर्यंत टाईम दर्शन सुविधा बंद करून थेट भाविकांना दर्शनरांगेत जाण्याचे आवाहन केले. पासेसची कटकट कमी झाल्याने भाविक आनंदून गेले.
दरम्यान संस्थानच्या स्पिकर्सवरून टाईम दर्शन पासेस घेण्याचे आवाहन सुरू असल्याने भाविकांचा गोंधळ उडाला. दरम्यान हे काऊंटर पुन्हा सुरू झाले.
ग्रामस्थांनी जावून पुन्हा ते बंद करीत भाविकांना आवाहन केले. उपकार्यकारी संदीप आहेर व पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्याशी चर्चा करून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी टाईम दर्शन काही काळ बंद ठेवण्याची आवश्यकता लक्षात आणून दिली. यावेळी अभी कोते, विकास गोंदकर, नितीन अशोक कोते, राहुल आहेर, प्रसाद बावचे, किरण कोते आदींचीही उपस्थिती होती. यानंतर दर्शन रांगांमध्ये जावून व्यवस्थित रांगा लावण्यात आल्या.
दर्शन व्यवस्था सुरळीत झाल्यानंतर सुधाकर शिंदे यांच्या हॉटेलमध्ये ग्रामस्थांची उपकार्यकारी अधिकारी आहेर यांच्या उपस्थितीत बैठक झाली़ या बैठकीला माजी नगराध्यक्ष कैलास कोते, पतिंगराव शेळके, अशोक गोंदकर, प्रमोद गोंदकर, सुजित गोंदकर, नितीन उत्तम कोते, दत्तात्रय कोते आदींची उपस्थिती होती.