महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ब्राह्मणी येथे ५ एकरमधील ऊस जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 06:36 PM2017-12-27T18:36:29+5:302017-12-27T18:36:42+5:30
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ब्राह्मणी येथे दोन दिवसात पाच एकर ऊस जळाला. यात शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने महावितरण विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
राहुरी : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ब्राह्मणी येथे दोन दिवसात पाच एकर ऊस जळाला. यात शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने महावितरण विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
राजेंद्र पांडुरंग वने यांचा दीड एकर तर, दीपक पांडुरंग वने यांचा अर्धा एकर, बाळकृष्ण गायकवाड यांचा एक एकर, राधुजी गायकवाड वीस गुंठे ऊस सोमवारी दुपारी जळाला. हा ऊस तोडणीसाठी आलेला होता. त्यामुळे ठिबक साहित्य आगीपासून बचावले. मंगळवारी सायंकाळी निलेश बाळासाहेब शिंदे यांचा सुमारे एक एकर ऊस ठिबकसह जळाला. मात्र, परिसरातील ग्रामस्थांमुळे वेळीच आग आटोक्यात आणण्यात यश मिळाल्याने शेजारील शेतक-यांचा ऊस वाचला. परिसरात बहुतेक वीज खांबांवरील तारा खाली असल्याने ऊस जळण्याची भीती शेतक-यांमधून व्यक्त केली जात आहे.
वीज तारांचे एकमेकांना घर्षण होऊन तीस गुंठे ऊस जळाला. परिसरातील तरुणांनी धावपळ करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला, अन्यथा शेजारील शेतक-यांचा ऊस जळाला असता. महावितरणने नुकसान भरपाई द्यावी.
-निलेश शिंदे, नुकसानग्रस्त शेतकरी.
घटना होण्यापूर्वी महावितरणच्या कर्मचा-याने वीज रोहित्रावर काम केले. मात्र, काम गांभीर्यपूर्वक न केल्याने ठिणगी पडून ऊस जळून खाक झाला. या नुकसानीची आम्हाला महावितरणकडून नुकसान भरपाई मिळावी.
-दीपक वने, नुकसानग्रस्त शेतकरी.