अण्णांची प्रकृती खालावल्याने राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:27 AM2018-03-29T11:27:36+5:302018-03-29T11:46:42+5:30
गेल्या सात आठ दिवसांपासून राळेगणसिद्धी परिवाराचे डोळे रामलीला मैदान व अण्णांच्या उपोषणाकडे लागले आहेत. आपलं संपूर्ण जीवन समाज व देशहितासाठी समर्पित केलेल्या ८० वर्षांच्या अण्णांच्या मागण्या मान्य होवो न होवो. परंतु, राळेगणसिद्धी परिवाराला अण्णा हवे आहेत.
एकनाथ भालेकर
राळेगणसिद्धी : गेल्या सात आठ दिवसांपासून राळेगणसिद्धी परिवाराचे डोळे रामलीला मैदान व अण्णा हजारे यांच्या उपोषणाकडे लागले आहेत. आपलं संपूर्ण जीवन समाज व देशहितासाठी समर्पित केलेल्या ८० वर्षांच्या अण्णांच्या मागण्या मान्य होवो न होवो. परंतु, राळेगणसिद्धी परिवाराला अण्णा हवे आहेत. आपण अण्णांना वाचवलं पाहिजे, असा चिंताक्रांत सूर ग्रामस्थांतून उमटत आहे. रोज होणाऱ्या ग्रामसभांमध्ये अण्णांच्या तब्येतीच्या काळजीने ग्रामस्थांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
सध्या अण्णांचे वय ८० असल्याने वृद्धापकाळात अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामस्थांचा आग्रह होता. परंतु, शेतक-यांचे व लोकपाल-लोकायुक्त नियुक्तीचे प्रश्न महत्वाचे असल्याचे सांगत अण्णांनी २३ मार्चपासून रामलीला मैदानावर उपोषण सुरू केले आहे. अण्णांचे उपोषण लवकर सुटावे यासाठी २३ मार्चपासून राळेगणसिद्धीत रोज आंदोलने व ग्रामसभा सुरू आहेत. सर्वच महिला - पुरूष या आंदोलनात सहभागी होतात.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन केंद्राचा मसुदा घेऊन अण्णांकडे गेल्यावर ग्रामस्थांना अण्णांचे उपोषण सुटेल अशी आशा मंगळवारी ( दि. २६ ) वाटली होती. परंतु, मागण्या मान्य होत नसल्याने अण्णांनी प्राण असेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला. त्यात त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
अण्णांचे ज्येष्ठ सहकारी सावळेराम पठारे म्हणाले की, अण्णांनी त्यांचा प्रपंच खूप मोठा केला आहे. ते नेहमी देश व समाजाचाच विचार करतात. या मतलबी सरकारला अण्णांची काहीच काळजी नाही. आम्हाला अण्णा पाहिजेत. एक वेळ मागण्या जरी मंजूर झाल्या नाही तरी अण्णांनी राळेगणला यावे. आमच्यासाठी अण्णा देव आहेत. त्यांनी आमच्यासाठी खूप केले आहे. आमच्या गावाला त्यांनी एक ओळख दिली. अण्णांचे बंधू मारूती हजारे म्हणाले, अण्णांचे उपोषण लवकर सुटावे, ही सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे. सरकारने जर त्यांच्या मागण्या लवकर मान्य केल्या नाही तर त्यांच्या अगोदर मीच माझा प्राण त्याग करील. अण्णा टीव्हीवर दिसत नसल्याने खूप चिंता वाटते. वर्तमानपत्रातच फक्त वाचायला मिळते.
टीव्हीवर थोडे फार जरी दिसले तरी समाधान वाटेल. मागण्या जरी मंजूर झाल्या नाहीतरी अण्णांनी आपले उपोषण मागे घेऊन अन्य मार्गांचा अवलंब करून सरकारची कोंडी करावी.