दुष्काळामुळे ऊस तोडणी मजूर दीडपटीने वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:07 AM2018-10-30T11:07:29+5:302018-10-30T11:07:34+5:30
दुष्काळी स्थितीने हैराण.. पोटाच्या खळगीचा प्रश्न.. जनावरांच्या चाऱ्याची चिंता.. मजुरी वाढीसाठी नेतेपातळीवर सुरू असलेला संप.. अशा परिस्थितीत ऊस तोडणी मजुरांनी अखेर कारखान्यांचा रस्ता धरला आहे.
उमेश कुलकर्णी
पाथर्डी : दुष्काळी स्थितीने हैराण.. पोटाच्या खळगीचा प्रश्न.. जनावरांच्या चाऱ्याची चिंता.. मजुरी वाढीसाठी नेतेपातळीवर सुरू असलेला संप.. अशा परिस्थितीत ऊस तोडणी मजुरांनी अखेर कारखान्यांचा रस्ता धरला आहे. दुष्काळामुळे यंदा दरवर्षीच्या तुलनेत ऊस तोडणीसाठी जाणा-या मजुरांची संख्या दीड पटीने वाढली आहे.
पाथर्डी तालुका हा दुष्काळी म्हणून राज्याला परिचित आहे. खरिपाची पिके हातात घेतल्यानंतर दसरा घरी साजरा करून तालुक्यातील सुमारे ४० ते ५० हजार मजूर दरवर्षी तोडणीसाठी राज्यातील तसेच परराज्यातील कारखान्यावर जातात. परंतु यंदा निसर्गराजा कोपल्याने खरीप आणि रब्बीही गेले. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चाºयाची स्थिती अत्यंत बिकट आहे. गावाकडे राहून करायचे काय? जगायचे कसे? या चिंतेने येथील मजूर ऊस तोडणीसाठी कारखान्यांकडे निघाले आहेत. तोडणी कामगारांच्या मजुरीत, मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ व्हावी, यासाठी संप पुकारलेला आहे. परंतु भाव वाढ होईल किंवा नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे सध्या मिळते ते पदरात पाडून घेण्यासाठी मजूर कारखान्याकडे रवाना होत आहेत. दरवर्षी मुकादम मजुरांकडे जाऊन कारखान्यावर जाण्यासाठी प्रयत्न करत. यावर्षी ‘मिळेल त्या उचलीवर’ मजूर कारखान्यावर जायला तयार झाला आहे. ‘काही मजूर तर आम्हाला घेऊन जा’ असे म्हणत मुकादमांकडे विनवणी करीत असल्याचे चित्र आहे.
नेते पातळीवर तोडणी कामगारांचा संप सुरू असला तरी याबाबत मात्र कोणताही नेता काहीही बोलायला तयार नाही. त्यामुळे पुढच्या दिवसांची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे मजूर संसाराला लागणाºया चीज वस्तूंची एखादी पेटी, लहान बापडे, अंगावर फाटकी चादर, काही मात्र ट्रॅक्टरवर उघड्यावर बसून जनावरांना घेऊन जात असल्याचे चित्र दिसते. तोडणी कामगारांची ही बि-हाडं डांबरी रस्त्यावरून तळपत्या उन्हात कारखान्याकडे निघाली आहेत.
अकोले (ता.पाथर्डी) येथील ऊस तोडणी मजूर वर्षा गिरी म्हणाल्या, चालूवर्षी फारच बेकार दिवस आले आहेत. गावाकडे कसे जगायचे हा प्रश्न आहे. आम्हालाच खायला नाही, तर जनावरांना कोठून आणणार, प्यायलाही काही दिवसांनी पाणी राहणार नाही. कारखान्यावर जाऊन कसे तरी सहा महिने काढू, असे त्यांनी सांगितले.मजूर कारखान्यावर गेल्याने गावामध्ये वृद्ध, शाळकरी मुले राहतात. त्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी झगडावे लागणार आहे. सध्या वीस ते तीस टक्के मजूर कारखान्यावर गेले आहेत.
ऊसतोड मजुरी वाढीबाबत साशंकता..
ऊसतोड मजूर, मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ व्हावी, यासाठी विविध संघटनांनी संप पुकारलेला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भाववाढ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे तालुक्यातील खरवंडी येथील मेळाव्यात जाहीर केले होते. परंतु त्यानंतर सावरगाव येथे झालेल्या दसरा मेळाव्यात मुंडे यांनी मजुरांच्या हातातील कोयता खाली घेण्यासाठी झटणार असल्याचे जाहीर केले. परंतु मजूर व मुकादमांच्या कमिशन वाढीबाबत चकार शब्द काढला नसल्याने भाववाढीचे काय होणार असा प्रश्न मजुरांसमोर आहे.