दुष्काळाच्या झळा : विकतच्या पाण्यावर जगते संपूर्ण गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 01:45 PM2018-11-03T13:45:11+5:302018-11-03T13:45:17+5:30
तालुक्यातील काही गावात यंदा पाऊस न झाल्याने पिके वाया गेली आहेत.
मुन्ना पठाण
कर्जत : तालुक्यातील काही गावात यंदा पाऊस न झाल्याने पिके वाया गेली आहेत. पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे टँकरची मागणी वाढू लागल्याचे चित्र आहे. तर काही गावात विकत पाणी घेण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ अधिक गडद होताना दिसत आहे.
कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात या गावात पाणी योजनेचे तिन्ही उद्भव कोरडे पडल्याने गावावर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. गावकऱ्यांना एक बॅरल २०० लिटर पाण्यासाठी ७० ते ८० रूपये मोजावे लागत आहे. शाश्वत पाणी पुरवठा योजना नसल्याने गावासमोर पुढच्या काळात पाण्याचे मोठे संकट उभे राहणार आहे.
या गावाची लोकसंख्या साधारण २२५० च्या जवळपास आहे. या गावाला पूर्वी दोन विहिरींद्वारे पाणी पुरवठा होता. परंतु काळानुरूप दोन्ही उद्भव कोरडे पडल्याने काही महिन्यांपूर्वी नवीन विहीर घेण्यात आली.
पाणी लागल्याने पाणी पुरवठाही सुरू झाला. परंतु त्या विहिरीची पाण्याची पातळी झपाट्याने खालावल्याने पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यातूनच आता या संपूर्ण गावावर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. खासगी पाण्याच्या टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतात नापिकी व गावात पाणी टंचाई यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गावाला टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. भविष्यात तुकाई चारी किंवा सिंचन योजनेच्या माध्यमातून गावाजवळील तलावात कुकडीचे पाणी सोडल्यास गावाच्या पाणी योजनेचा मोठा प्रश्न सुटेल. यासाठी भविष्यात तुकाई चारी प्रकल्प मार्गी लागण्याची गरज आहे.
गावाच्या पाणी योजनेच्या जुन्या दोन व नवीन एक विहीर आटल्याने सध्या गावात पाणी टंचाई असल्याने २०० लिटर पाण्यासाठी ७० ते८० रूपये मोजावे लागत आहेत. -परशुराम हरी काळदाते, ग्रामस्थ, चिंचोली काळदात.
पाणी टंचाईमुळे टँकरचा प्रस्ताव दाखल केला आहे. पाणी योजनेच्या विहिरीला आडवे बोअर घेऊन पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू आहे. - रघुआबा काळदाते, उपसरपंच, चिंचोली काळदात