रुग्ण संख्या वाढल्याने नगर शहरातील हा परिसर झालाय ‘हॉटस्पॉट’, अत्यावश्यक सेवाही बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 10:54 AM2020-05-14T10:54:44+5:302020-05-14T11:25:15+5:30
अहमदनगर : शहरातील झेंडीगेट परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने हा भाग जिल्हा प्रशासनाने ‘हॉटस्पॉट पॉकेट’ म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे येथील आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री १४ मे पासून २७ मे पर्यंत बंद राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहरातील झेंडीगेट परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने हा भाग जिल्हा प्रशासनाने ‘हॉटस्पॉट पॉकेट’ म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे येथील आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री १४ मे पासून २७ मे पर्यंत बंद राहणार आहे. झेंडीगेट परिसरातील सुभेदार गल्ली भागात गेल्या दोन दिवसात चार कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हा प्रशासन, तसेच पोलिसांनी या भागाची पाहणी करून हा परिसर सील करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बुधवारी रात्री हा परिसर हॉटस्पॉट घोषित करण्याबाबत आदेश काढला. त्यानुसार या परिसरातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री १४ मे सकाळी सहा वाजल्यापासून २७ मे रोजी रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहील. येथील नागरिकांना अत्यावश्यक सेवा शासकीय यंत्रणेमार्फत सशुल्क पुरवण्यात येतील. वाहने तसेच सर्व नागरिकांच्या जाण्या-येण्यास प्रतिबंध असेल.
--------------------------
असा असेल हॉटस्पॉट एरिया
रामचंद्र खुंट, पोखरणा हॉस्पिटल, झेंडीगेट चौक, मनपा प्रभाग कार्यालय शाळा क्रमांक ४, आंबेडकर चौक, जुने नगर तालुका पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय उत्तर-पश्चिम बाजू, हॉटेल कल्याण, डावरे गल्ली, नालबंद खुंट व रामचंद्र खुंट असा हा परिसर हॉटस्पॉट असेल. या क्षेत्राच्या मध्यापासून दोन किलोमीटरपर्यंत ‘कोअर एरिया’ म्हणून घोषित करण्यात आला. आहे
----------
जिल्हाधिकारी कार्यालय 'हॉटस्पॉट'मधून वगळले
या हॉटस्पॉट एरियामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर येतो. परंतु कोरोना संनियंत्रणाचे सर्व कामकाज जिल्हाधिकारी कार्यालयातून चालते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय हॉटस्पॉट प्रतिबंधातून वगळण्यात आले आहे.