कांद्याचे कर्ज वाढल्यामुळे शेतकऱ्याने संपविली मुळा नदीत जीवनयात्रा
By Admin | Published: April 8, 2017 06:32 PM2017-04-08T18:32:07+5:302017-04-08T18:32:07+5:30
गेल्या दोन वर्षांपासून कांदा पिकाला मातीमोल भाव मिळत असल्याने घोरपडवाडी (ता़ राहुरी) येथील शेतकरी देवराम रखमा शेंडगे (वय ५५) यांच्यावरील कर्जाचा बोजा मोठा वाढला.
आॅनलाईन लोकमत
राहुरी (अहमदनगर), दि़ ८- गेल्या दोन वर्षांपासून कांदा पिकाला मातीमोल भाव मिळत असल्याने घोरपडवाडी (ता़ राहुरी) येथील शेतकरी देवराम रखमा शेंडगे (वय ५५) यांच्यावरील कर्जाचा बोजा मोठा वाढला. त्यामुळे त्यांनी मुळा नदी पात्रातील डिग्रस बंधाऱ्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी उघडकीस आली़
शनिवारी मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. घोरपडवाडी येथे शेंडगे यांना तीन एकर जमीन आहे़ त्यांनी दोन एकर क्षेत्रावर पुन्हा कांदा पीक घेतले़ मात्र सोसायटी कर्ज व अन्य हात उसने घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाले़ कर्जाचा डोंगर वाढल्याने गेल्या काही दिवासांपासून शेंडगे अस्वस्थ होते़ नातेवाईकांकडून पैसे घेऊन येतो, असे घरी सांगून देवराम शेंडगे हे बाहेर गावी गेले़ गेल्या तीन दिवसांपासून नातेवाईकांकडे शोध सुरू होता़ शनिवारी डिग्रस बंधाऱ्यामध्ये प्रेत आढळल्याचे नातेवाईकांना समजले़ त्यानंतर दुपारी चिरफाड बंगल्यामध्ये असलेला मृतदेह नातेवाईकांनी ओळखला़
डिग्रसचे पोलीस पाटील रावसाहेब पवार यांनी राहुरी पोलीस ठाण्यात माहिती दिली़ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकाँस्टेबल मोकाटे करीत आहेत़ मयत शेंडगे यांच्यामागे पत्नी,दोन मुले असा परिवार आहे़ राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़
मुळा नदी पात्रात विवस्त्रावस्थेत ५५ वर्षीय पुरुषाचे प्रेत आढळले़ त्याच्या छातीवर जखमा आढळून आल्या़ २० फुटावरून उडी मारल्यास किंवा अन्य कारणाने जखम होऊ शकते़ पोलीस तपासात पुढील माहिती उपलब्ध होऊ शकेल, असे वैद्यकीय अधिकारी डॉ़ सुधीर क्षीरसागर यांनी सांगितले़
दर कोसळल्याने आर्थिक फटका
नोटाबंदी व शेतमालाला भाव मिळत नसल्याने राहुरी तालुक्यातील बागायती भागालाही जोरदार आर्थिक फटका बसला आहे़ शेतकऱ्यांंवर मोठ्या प्रमाणात सहकारी सोसायट्या, बँका, सावकार व नातेवाईक यांचे कर्ज वाढले आहे़ कांद्याला सरासरी चार रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे़