सुविधा नसल्यामुळे शिर्डी विमानतळ केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे चालवण्यास द्यावे - प्रफुल पटेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 07:02 PM2018-01-08T19:02:38+5:302018-01-08T19:05:10+5:30
शिर्डी विमानतळावर सुविधांची वाणवा असल्याने हे विमानतळ केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाला चालवण्यासाठी देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डीत केली.
शिर्डी : शिर्डीला येणा-या भाविकांसाठी विमानतळ सुरू करण्यात आले असून त्यास भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र शिर्डी विमानतळावर सुविधांची वाणवा असल्याने हे विमानतळ केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाला चालवण्यासाठी देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डीत केली.
दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात साईदरबारी हजेरी लावणा-या पटेल यांनी सोमवारी दुपारी सार्इंच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली. यावेळी पत्रकारांशी बोलताना पटेल यांनी कोरेगाव भिमा प्रकरणात महाराष्ट्र शासनाची यंत्रणा असफल ठरली असल्याचा आरोप केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहु, महात्मा फुलेंचा महाराष्ट्राला मोठा वारसा असल्याचे सांगत पटेल यांनी काही लोक बाबासाहेबांचा वारसा खराब करण्याचे प्रयत्न करत असून सध्याचे सरकार याकडे दुर्लक्ष करतेय. हा ध्रुवीकरण करण्याचाच प्रयत्न असल्यांची त्यांनी टिका केली. शेतक-यांच्या शेती मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. गुजरात निवडणुकीत भाजपाला मोठ्या प्रमाणात शेतक-यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्र सरकारने शेतक-यांची कर्ज माफी करून चालणार नाही तर शेतक-यांच्या मालाला योग्य भाव देण्याची गरज असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.