गर्दी नियंत्रणात येत नसल्यामुळे नगर बाजार समिती ३१ मार्चपर्यंत राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 04:15 PM2020-03-24T16:15:35+5:302020-03-24T16:17:05+5:30
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी बाजार समिती प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्यात मंगळवारी (२४ मार्च) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बाजार समितीने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अहमदनगर : कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी बाजार समिती प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्यात मंगळवारी (२४ मार्च) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बाजार समितीने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बाजार समित्या बंद ठेवून शहरात फेरीवाल्यांना परवानगी देण्याच्या निर्णयापर्यंत प्रशासन आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिका-यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना सूचना दिलेल्या आहेत. परंतु फेरीवाले नेमके कोण? याबाबत तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळी नगर बाजार समितीतील भाजी मार्केटमध्ये मोठी गर्दी उसळली होती. ही गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर बंदचा निर्णय घेण्यात आला.
.....
३१ मार्चपर्यंत कै. माजी खासदार दादा पाटील शेळके नगर बाजार समितीमधील संपूर्ण भाजीपाला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के व सचिव अभय भिसे यांनी दिली. तेव्हा शेतक-यांनी आपला भाजीपाला बाजार समितीमध्ये ३१ मार्चपर्यंत विकण्यास आणू नये, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने त्यांंनी केले आहे.